The chief organizer of the Naxal movement Gajad, Gadchiroli police action | नक्षल चळवळीची मुख्य सूत्रधार गजाआड, गडचिरोली पोलिसांची कारवा
नक्षल चळवळीची मुख्य सूत्रधार गजाआड, गडचिरोली पोलिसांची कारवा

गडचिरोली : नक्षल चळवळीची मुख्य सूत्रधार नर्मदाक्का ऊर्फ निर्मलाकुमारी ऊर्फ नर्मदादीदी (५८) रा.कोडापावनुरू जि.कृष्णा (आंध्रप्रदेश) व तिचा पती नक्षलवाद्यांच्या पब्लिकेशनचा प्रमुख किरण ऊर्फ सत्यनारायणा (७०) रा.नरेंद्रपुरम (आंध्रप्रदेश) या दोघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चार ते पाच महिन्यांपासून पोलीस नर्मदाक्का व तिच्या साथीदारांच्या मागावर होते. तेलंगणा राज्यातून नर्मदाक्का व तिचा पती किरण हे दोघेही सोमवारी सिरोंचामार्गे गडचिरोली जिल्ह्यात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली. तेलंगणा पोलिसांच्या मदतीने सिरोंचात सापळा रचण्यात आला. सिरोंचा येथील बसस्थानकावर सिव्हील ड्रेसवर नर्मदाक्का व तिचा पती वाहनाची प्रतीक्षा करीत होते. मागावरच असलेल्या गडचिरोली पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. ११ जून रोजी रात्री तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गडचिरोली न्यायालयाने या दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दोघांवरही प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. नर्मदाक्का ही मागील २५ ते ३० वर्षांपासून नक्षल चळवळीतील वरिष्ठ कॅडरची नक्षलवादी आहे. अनेक मोठ्या हिंसक घटना तिच्याच मार्गदर्शनात नक्षलवाद्यांनी घडवून आणल्या. सात दिवसांच्या पोलीस कोठडीदरम्यान नक्षल चळवळीविषयीची बरीचशी माहिती पोलिसांना उपलब्ध होईल. या कारवाईमुळे नक्षल चळवळीला फार मोठा हादरा बसला आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले.

कोण आहे ही नर्मदाक्का?
नर्मदाक्का ही नक्षल चळवळीच्या वरिष्ठ कॅडरची व अत्यंत निष्ठूर म्हणून ओळखली जाणारी नक्षलवादी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील विविध हिंसक घटनांबाबत तिच्या विरोधात ६५ गुन्हे दाखल आहेत. १ मे रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथील भुसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले. या घटनेची जबाबदारी नक्षलवाद्यांच्या पश्चिम रिजनल ब्युरोने घेतली होती. या ब्युरोची नर्मदाक्का ही प्रमुख आहे. नक्षल चळवळीची मुख्य सूत्रधार असलेल्या नर्मदाक्काला तपासादरम्यान पोलिसांनी नक्षल चळवळीमुळे दुर्गम व आदिवासी भागाचा विकास झाला काय? किंवा भविष्यात होणार आहे काय? असाप्रश्न केला असता, ती निरूत्तर झाली.


Web Title: The chief organizer of the Naxal movement Gajad, Gadchiroli police action
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.