'मुख्यमंत्री योजनादूत'; आज शेवटची संधी ! ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक ५ हजार लोकसंख्येमागे एक योजनादूत नेमणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 12:23 IST2024-09-13T12:23:00+5:302024-09-13T12:23:17+5:30
जिल्ह्यात ६४७ जागा : जिल्ह्यात १ हजार २०८ उमेदवारांचे अर्ज

'Chief Minister Planner'; Today is the last chance! At Gram Panchayat level, one planner will be appointed for every 5 thousand population in urban areas
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार, १३ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार २०८ उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत 'मुख्यमंत्री योजनादूत' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक ५ हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी जिल्ह्यात ६४७ जागांकरिता १२ सप्टेंबरपर्यंत १ हजार २०८ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
काय हवी पात्रता ?
इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाइल (स्मार्ट फोन) आणि आधार संलग्न बैंक खाते आवश्यक आहे.
ही कागदपत्रे सादर करावी लागणार
उपक्रमासाठी केलेला ऑनलाइन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र आदी, अधिवासाचा दाखला, अर्जाचा नमुना नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.
... तेव्हाच होणार नोंदणी पूर्ण
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी शुक्रवार, १३ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे, अशा उमेदवारांनी 'अप्लाय' बटन दाबून अर्ज 'सबमिट' करायला विसरू नये तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.