नळ जोडणीची तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST2021-04-21T04:36:17+5:302021-04-21T04:36:17+5:30

कुरखेडा : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचले जात आहे. यामुळे इतर पुरेसा ...

Check the plumbing connection | नळ जोडणीची तपासणी करा

नळ जोडणीची तपासणी करा

कुरखेडा : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचले जात आहे. यामुळे इतर पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.

घरांची दुरवस्था कायम

गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी ५०० घरांची स्वतंत्र कॉलनी वसविण्यात आली आहे. या कॉलनीतील घरांची दुरवस्था झाली आहे. या घरांमध्ये राहणेही कठीण झाले आहे.

गावकऱ्यांचे हाल

चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील वेंगनूर येथे अद्यापही शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. तळोधी मो., भेंडाळा, कान्होली, कमळगाव या भागात पक्के रस्ते तयार केले नाहीत.

अतिक्रमण वाढले

गडचिरोली : गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या सिंचाई विभागाच्या तलावात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. यावर्षी तलावात पाणी कमी असल्याने आणखी जागा हडप करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून चालविला जात आहे.

कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करा

धानोरा : शहरातील अनेक वॉर्डांतील नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. उलट काही लोक गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे.

शाळा आवारात जनावरे

आलापल्ली : दुर्गम गावातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही पक्क्या स्वरूपाची संरक्षक भिंत उभारण्यात आली नाही, तसेच अनेक शाळांना प्रवेशद्वार उभारण्यात आले नाही. परिणामी गावातील मोकाट जनावरे शाळा परिसरात हैदोस घालत आहेत.

बोधनखेडा रस्त्याची दुर्दशा कायम

धानोरा : तालुक्यातील कुलभट्टी-बोधनखेडा या कच्च्या मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कुलभट्टी ते बोधनखेडा हे सात कि.मी.चे अंतर असून या मार्गावर गिट्टी पूर्णत: उखडली आहे. सदर मार्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. सदर मार्गावर दोन नाले असून, त्यावर पुलाचा अभाव आहे. नाल्यावर पूल बनविणे आवश्यक आहे. पावसाळ्यात चार महिने या मार्गावरील वाहतूक बंद असते. अशावेळी गावात एखादी आकस्मिक घटना घडल्यास बोधनखेडावासीयांना काहीच पर्याय नसतो. गंभीर रुग्णांना औषधोपचारासाठी पावसाळ्यात मार्ग नसल्याने तालुका व जिल्हा स्थळावर नेता येत नाही.

कमलापूर परिसरात वीज चोरी वाढली

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथे अनेक वर्षांपासून काही नागरिक घरी विद्युत मीटर न लावता वीज चोरी सर्रास करीत आहेत; परंतु या प्रकाराकडे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. गावातील मुख्य चौकात काही व्यापारी दिवसाढवळ्या विजेची चोरी करतात; परंतु विद्युत कर्मचारी या प्रकाराकडे कानाडोळा करीत आहेत. मात्र, याचा आर्थिक फटका गावातील अन्य ग्राहकांना सोसावा लागत आहे. सर्रास वीज चोरी केली असताना या व्यावसायिकांवर महावितरण कंपनीतर्फे का कारवाई केली जात नाही, असा सवाल गावातील नागरिकांनी केला आहे. कमलापूर हा दुर्गम भाग असल्याने अधिकाऱ्यांमार्फत वीज जोडणी अथवा कनेक्शनची तपासणी होत नसल्याने सदर प्रकार वाढत आहेत.

वाघोली परिसरात इंटरनेटची समस्या

भेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात मागील काही दिवसांपासून बीएसएनएल कंपनी व इतर खासगी कंपन्यांचे नेटवर्क वारंवार विस्कळीत होत आहे, तसेच इंटरनेटची अत्यंत कमी स्पीड असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. भेंडाळा परिसरात १५ गावांचा समावेश आहे. येथे बीएसएनएलचे टॉवर आहे. त्यामुळे परिसरातील अनेक ग्राहकांकडे बीएसएनएलची सेवा उपलब्ध आहे; परंतु सदर सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. इतर खासगी कंपन्या फोर-जी सेवा देत असतानाही बीएसएनएल थ्री-जी सेवा देत आहे. त्यातही इंटरनेट स्पीड अत्यंत संथ आहे. अनेकदा कव्हरेज, तसेच इंटरनेट विस्कळीत होतो. सातत्याने मागणी करूनही बीएसएनएलने सेवेत सुधारणा केली नाही.

अनेक वर्षांपासून उंच पुलाची प्रतीक्षा कायम

लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी-हळदी माल गावादरम्यान मोठा नाला आहे. या नाल्यावर ३० वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. सदर पूल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात अनेकदा पुलावरून पाच ते सहा फूट पाणी वाहत असते. परिणामी वाहतूक ठप्प होते. त्यामुळे या ठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर मार्गावरून एसटी महामंडळाच्या बस, दुचाकी, चारचाकी वाहने ये-जा करीत असतात. सदर पुलाची उंची १० ते १५ फूट आहे. सदर नाला वैनगंगा नदीला जोडला असून, पूल आणि नदी यामधील अंतर एक कि.मी. आहे. वैनगंगा नदीला भरती आल्यानंतर या पुलापर्यंत दाब निर्माण होतो. परिणामी या भागात पाऊस नसला तरी पुलावरील पाणी उतरत नाही. नाल्याच्या पलीकडील हळदी, गणपूर, मुधोली आदी गावांतील मजूर याच मार्गाने पावसाळ्यात धान रोवणीसाठी लखमापूर बोरी येथे येतात, तसेच अन्य गावांतील नागरिक लखमापूर बोरीला विविध कामानिमित्त येतात. हळदी, गणपूर, जैरामपूर, येनापूर येथील शालेय विद्यार्थी याच मार्गाने चामोर्शी व लखमापूर बोरी येथे शिक्षणासाठी येतात. सदर पूल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात हा मार्ग ठप्प होतो. त्यामुळे हळदी माल गावादरम्यानच्या नाल्यावर उंच पूल बांधण्याची मागणी आहे.

कान्होलीत नाल्यांचा अभाव

भेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या कान्होली गावातील काही वॉर्डांमध्ये पक्क्या नाल्यांचा अभाव असल्याने रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. गावात रोगराई पसरण्याची शक्यता असतानाही उपाययोजना करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. नाल्यातील गाळाचा उपसा झाला नाही. त्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. कच्च्या स्वरूपात असलेल्या नाल्यातील गाळ उपसा न झाल्याने नाल्या गाळाने तुडुंब भरून आहेत. पावसाचे पाणी व सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते. गावातील हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाचा अपवाद वगळता साधारणत: सर्वच रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियाेजन शून्यतेमुळे गावातील रस्ते व नाल्यांची व्यवस्था पूर्णत: ढासळली आहे. परिणामी नागरिक त्रस्त झाले आहेत.

वीज तारांपासून नागरिकांना धोका

आरमोरी : येथील पालोरामार्गे जाणाऱ्या टॉवर परिसरातील रस्त्याच्या कडेला विद्युत तारा लोंबकळत आहेत. आरमोरी शहरात बऱ्याच ठिकाणी अशी स्थिती आहे. काही ठिकाणी विद्युत खांब कमी उंचीचे असल्याने येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने तारा ताणाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वीजपुरवठा खंडित होऊ नये, तसेच दुर्घटना घडू नये, यासाठी काळजी घेणे महावितरण कंपनीचे काम आहे; परंतु याकडे वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात आहे. या सदर लोंबकळणाऱ्या तारांपासून दुर्घटना घडू शकते. रस्त्याने आवागमन करताना नागरिकांना विजेचा झटका लागण्याची भीती आहे.

सुरगावातील समाज मंदिरांची दुरवस्था

मुलचेरा : तालुक्यातील वेंगनूर ग्रा.पं.अंतर्गत सुरगाव व अडंगेपल्ली येथे समाजमंदिराच्या इमारतीचे आमदार निधीतून बांधकाम करण्यात आले. या समाजमंदिराच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने इमारतींची दैनावस्था झाली आहे. या इमारतींवर लाखो रुपयांचा खर्च होऊनही त्या निकामी झाल्या आहेत. मुलचेरा खासगी व सार्वजनिक कार्यक्रम करण्याच्या उद्देशाने इमारती बांधण्यात आल्या. या इमारतींची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. मात्र, ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. खिडक्या, दरवाजे, तावदाने तुटली आहेत. गावातील मोकाट जनावरांच्या आश्रयाचे ठिकाण बनले आहेत. सुरगाव व अडंगेपल्ली ही दोन्ही गावे येतात. सदर दोन्ही गावांतील समाजमंदिराची दुरुस्ती ग्रा.पं. निधीतून करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Check the plumbing connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.