लग्नापूर्वी रक्ताची तपासणी करा
By Admin | Updated: June 21, 2014 01:40 IST2014-06-21T01:40:50+5:302014-06-21T01:40:50+5:30
लग्नापूर्वी ज्याप्रमाणे मुला-मुलीची कुंडली बघितली जाते. त्याचप्रमाणे या दोघांनीही सिकलसेल आजाराविषयीची रक्त तपासणी करावी, असे आवाहन जि. प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी केले.

लग्नापूर्वी रक्ताची तपासणी करा
गडचिरोली : लग्नापूर्वी ज्याप्रमाणे मुला-मुलीची कुंडली बघितली जाते. त्याचप्रमाणे या दोघांनीही सिकलसेल आजाराविषयीची रक्त तपासणी करावी, असे आवाहन जि. प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी केले.
जागतिक सिकलसेल नियंत्रण दिनानिमित्य जिल्हा सामान्य रूग्णालयात सिकलसेलग्रस्त रूग्णांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले़ याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ अनिल रूढे हे होते. याप्रसंगी डॉ़ शशिकांत शंभरकर यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ़ शेंद्रे, जिल्हा हिवताप अधिकारी रविंद्र ढोले यांनी हिवताप आजाराबाबत माहिती दिली़ वैद्यकिय अधिकारी डॉ़ सतिश मेश्राम तसेच डॉ. गौतम यांनी सिकलसेल आजाराबाबत व त्यावरील औषधोपचाराबाबत माहिती दिली़ रक्त संक्रमण अधिकारी डॉ़ शैलेजा मैदमवार व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक डॉ़ प्रियंका मेश्राम यांनी सिकलसेलग्रस्त रूग्णांना टेलीमेडीसीनद्वारे तपासणी करून व योग्य उपचाराकरिता तज्ज्ञांचा सल्ला घेण्याविषयी रूग्णांना सांगितले. जिल्हा सिकलसेल समन्वयक रचना फुलझेले, आरोग्य विभाग व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे कर्मचारी उपस्थित होते़
अध्यक्षीय भाषणादरम्यान डॉ़ रूढे यांनी सिकलसेलग्रस्त व्यक्तीला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ व १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी २० मिनिटे जास्त दिले जातात, अशी माहिती दिली. कार्यक्रमदरम्यान मोफत सिकलसेल आजार तपासणी, सिकलसेलग्रस्तांना नोंदणी कार्ड व औषधांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सिकलसेल समन्वयक रचना फुलझेले यांनी केले़ तर उपस्थितांचे आभार महेश कामडी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनाली जोगदंडे, शबनम अन्सारी, सिकलसेल समुपदेशक प्रीती बिसेन, अर्श समन्वयक विशाखा काटवले, कार्यक्रम व्यवस्थापक शास्त्रकार, पर्यवेक्षक बादल मेश्राम तसेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले़ (नगर प्रतिनिधी)