चामोर्शीत लोकप्रतिनिधींचा लागणार कस
By Admin | Updated: April 23, 2015 01:29 IST2015-04-23T01:29:15+5:302015-04-23T01:29:15+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणावर सर्वाधिक प्रभाव दाखविणारा तालुका म्हणून चामोर्शी तालुक्याची ओळख आहे.

चामोर्शीत लोकप्रतिनिधींचा लागणार कस
रत्नाकर बोमीडवार चामोर्शी
गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणावर सर्वाधिक प्रभाव दाखविणारा तालुका म्हणून चामोर्शी तालुक्याची ओळख आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या चामोर्शी ग्रा.पं.च्या निवडणुकीत विद्यमान लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांचे समर्थक प्रचारात चांगले भिडून आहेत.
चंद्रपूर-गडचिरोली संयुक्त जिल्हा असतानाही येथील नेत्यांचेच वर्चस्व होते. हे आजतागायत कायम आहे. माजीमंत्री व माजी खासदार मारोतराव कोवासे व माजी आमदार नामदेवराव उसेंडी यांचा गृह तालुका असून विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी, जि.प. बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, माजी बांधकाम सभापती रवी बोमनवार, माजी जि.प. उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे, माजी जि.प. अध्यक्ष संध्या दुधबळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, प्रमोद वायलालवार, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर यासलवार व जुन्या पिढीत ज्येष्ठ नेते गंगाधरराव गण्यारपवार, सुखदेव नैताम यांचेसारखे दिग्गज व धुरंधर नेते चामोर्शीला वास्तव्यात असल्याने जिल्ह्याचे लक्ष चामोर्शी ग्रामपंचायतकडे लागले आहे.
दिग्गजांनी आपले डावपेच उघड केले नसले तरी राजकीय बँड वाजू लागला की, त्यांचे हातपाय आपोआप हलू लागतात. आपल्या समर्थकांचा प्यादा म्हणून उपयोग करणे सुरू होते. शेवटी उमेदवार म्हणून उभा राहणारा व्यक्ती हा कोणत्याही गटाचा असतोच. गावात लागलेल्या बॅनरवर त्यांच्यापैकीच अनेकांचे नावे आहेत. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे यांनी वॉर्ड क्रमांक २ मध्ये स्वत:च्या पत्नीला रोशनी वरघंटे यांना उभे ठेवून प्रत्येक वार्डात आपले युवा कार्यकर्ते उभे केले आहे. विद्यमान सरपंच मालन बोदलकर वॉर्ड क्रमांक चार मधून उभ्या असल्याने तेथेही चुरस आहे. माजी सरपंच भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या छाया कोहळे, पत्रकार नरेंद्र सोमनकर, अमिन साखरे, वॉर्ड क्रमांक ५ मध्ये उभे ठाकल्याने तेथील राजकीय झूंज उत्कंठापूर्ण असेल.
तर वॉर्ड क्रमांक ६ मध्ये रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राम नैताम यांचे अत्यंत निकटवर्तीय सुमेध तुरे उभे असल्याने व ते सरपंच पदाचे दावेदार असल्याने त्यांनाही आरपारची लढाई लढावी लागली. त्याच वॉर्डातून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जुन्या पिढीचे सुखदेव नैताम यांचा मुलगा निशांत नैतामला उभे करून ग्रा.पं.वर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना युवा नेते अभय बर्लावार यांचे तगडे आवाहन आहे. प्रमोद वायलालवार व अतुल गण्यारपवार यांचे निकटस्थ ग्रा.पं. सदस्य विजय शातलवार वॉर्ड क्रमांक २ मधून उभे असल्याने त्यांनाही आपले वर्चस्व सिध्द करावे लागणार आहे.
सरपंच पद अनुसूचित जमातीकरिता राखीव असल्याने सुमेध तुरे, अनिल भैसारे, लक्ष्मण रामटेके, अरूण डंबारे, प्रज्ञा उराडे यांनी जंगी तयारीच चालविली आहे. इतकेच नव्हे तर अनुसूचित जातीच्या शोभा तुरे व यशोधरा लाकडे यांनी सर्वसाधारण जागेवर उभ्या राहून सरपंच पदासाठी दावेदारी ठोकण्याची तयारी चालविली आहे.
चामोर्शी ग्रामपंचायतसाठी ११ हजार ९८७ मतदार मतदान करून उमेदवारांसोबत दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरविणार आहे. अनेक स्थानिक नेत्यांचे अस्तित्व पणास लागले असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय चुरशीची होईल, यात शंका नाही. विकासाच्या अजेंड्यापेक्षा राजकीय प्रस्थ वाढविण्याचा अजेंडा समोर ठेवून निवडणूक लढविल्या जात आहे. चामोर्शी ही जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत असल्याने विविध राजकीय पक्षाची प्रतिष्ठा येथे पणाला लागून आहे.