प्रभारी ठाणेदाराच्या विरोधात धानोरात चक्काजाम
By Admin | Updated: August 31, 2014 23:47 IST2014-08-31T23:47:42+5:302014-08-31T23:47:42+5:30
धानोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव माळी यांनी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अलाउद्दीन लालानी यांच्या विरोधात दाखल झालेल्या एका तक्रारीच्या आधारे त्यांना पोलीस ठाण्यात

प्रभारी ठाणेदाराच्या विरोधात धानोरात चक्काजाम
धानोरा : धानोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव माळी यांनी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अलाउद्दीन लालानी यांच्या विरोधात दाखल झालेल्या एका तक्रारीच्या आधारे त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून धमकाविण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर संपूर्ण धानोरा गावात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. नागरिकांनी दिवसभर व्यावसायीक प्रतिष्ठाणे बंद करून आंतरराज्यीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे तब्बल सात तास वाहतूक रखडलेली होती. आंदोलकांचा संताप प्रचंड तीव्र होता. दीड हजाराच्या संख्येत असलेल्या आंदोलकांनी महामार्गावरच प्रभारी पोलीस निरिक्षक वैभव माळी यांचा पुतळाही जाळला. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी धानोरा येथे धाव घेतली. त्यांच्या समावेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हसनअली गिलानी, जि.प. सभापती निरांजनी चंदेल, साईनाथ साळवे, मलिक बुधवानी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. घटनेनंतर दिवसभर धानोराची बाजारपेठ बंद होती. त्यानंतर आंदोलकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बापू बांगर यांची शिष्टमंडळाद्वारे भेट घेतली. वैभव माळी यांच्या विरोधात परिसरातील नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांच्या कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहेत. त्यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी केली. यावेळी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. जो पर्यंत माळी यांचे निलंबन होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला. तसेच पोलीस उपनिरिक्षक चेतन थोरबोले यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी वैभव माळी यांची सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे बदली करण्यात आली, असे पत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात धानोरा येथे पाठविले. दरम्यान आंदोलकांना बापू बांगर यांनी पत्रातील मजकूर वाचून दाखविले व माळी यांची बदली करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. आंदोलकांनी यावेळी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.