गडचिरोलीतील चंद्रपूर मार्ग बनलाय सुगंधित तंबाखूचे हब; प्रशासनाची डोळेझाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 18:27 IST2022-04-16T18:07:34+5:302022-04-16T18:27:58+5:30
चंद्रपुरातून पुरवठा केला जाणारा हा सुगंधित तंबाखू चंद्रपूर मार्गासह गडचिरोली शहरातील काही काही चिल्लर विक्रेत्यांना तसेच चामोर्शी तालुक्यात पुरविला जातो.

गडचिरोलीतील चंद्रपूर मार्ग बनलाय सुगंधित तंबाखूचे हब; प्रशासनाची डोळेझाक
गडचिरोली : ख-र्यासाठी वापरल्या जाणऱ्या सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर बंदी असली, तरी गडचिरोली शहरात हा तंबाखू बिनधास्तपणे विक्री केला जात आहे. चंद्रपुरातून येणाऱ्या या तंबाखूचा साठा करणारे मोठे केंद्र शहरातील आठवडीबाजाराजवळ आहे. मात्र आजपर्यंत त्या केंद्रावर पोलीस किंवा अन्न प्रशासन विभागाने कारवाई केलेली नाही.
चंद्रपुरातून पुरवठा केला जाणारा हा सुगंधित तंबाखू चंद्रपूर मार्गासह गडचिरोली शहरातील काही काही चिल्लर विक्रेत्यांना तसेच चामोर्शी तालुक्यात पुरविला जातो. त्यांच्यामार्फत तो खर्रा बनविणाऱ्या पानठेलेचालकांना पुरविला जातो. हे काम ज्या पद्धतीने सुरू आहे त्यावरून या सुगंधित तंबाखूवर बंदी आहे की नाही, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
सुगंधित तंबाखूच्या एका ख-र्याची विक्री ३० रुपयांना होते. दिवसभर गडचिरोली शहरात ४ ते ५ हजार ख-र्याची विक्री होते. यावरून सुगंधित तंबाखूचा वापर किती प्रमाणात होतो याचा अंदाज येतो. मजा आणि ईगल या दोन कंपन्यांचा सुगंधित तंबाखू जास्त प्रमाणात विक्री होते.
बाजार चौकाजवळील साठा केंद्राला कोणाचा आशीर्वाद?
चंद्रपूरकडून येणारा लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा आठवडी बाजार चौकातील एका ‘भाई’कडे उतरविला जातो. तेथून त्या तंबाखूच्या डब्यांची इतर चिल्लर विक्रेत्यांकडे विल्हेवाट लावली जाते. मात्र, आजपर्यंत त्या भाईवर कारवाई करण्याची हिंमत कोणी केली नाही. याच्यामागे नेमके कोणते रहस्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीसच नाही, तर अन्न प्रशासन विभागही त्याकडे डोळेझाकपणा करीत आहे.