चामोर्शीचे उपजिल्हा रूग्णालय रखडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:01:04+5:30

चामोर्शी तालुक्यातील लोकसंख्या, विस्तार व रूग्णांची संख्या लक्षात घेता येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्याची अनेक दिवसांपासून जनतेची मागणी होती. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेली ही मागणी महाराष्ट्र शासनाने १७ जानेवारी २०१३ मध्ये सन २००१ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा मंजूर केला.

Chamorshi sub-district hospital is in a state of disrepair | चामोर्शीचे उपजिल्हा रूग्णालय रखडलेलेच

चामोर्शीचे उपजिल्हा रूग्णालय रखडलेलेच

ठळक मुद्देसात वर्षांपासून प्रतिक्षाच : आरोग्य सेवा कोलमडली

रत्नाकर बोमीडवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्यासाठी शासनाने मान्यता दिली. मात्र त्यानंतर कुठलीही कार्यवाही न झाल्याने चामोर्शी तालुक्यातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची प्रतीक्षा कायम आहे.
चामोर्शी तालुक्यातील लोकसंख्या, विस्तार व रूग्णांची संख्या लक्षात घेता येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्याची अनेक दिवसांपासून जनतेची मागणी होती. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेली ही मागणी महाराष्ट्र शासनाने १७ जानेवारी २०१३ मध्ये सन २००१ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा मंजूर केला. त्यात चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात उपलब्ध असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयामध्ये श्रेणी वर्धन करण्यास मान्यता देण्यात आली. परंतु साडेसात वर्ष उलटूनही या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे जनतेत संताप व्यक्त केला जात आहे.
चामोर्शी तालुक्यात ७५ ग्राम पंचायती, एक नगर पंचायत असून एकूण २१० गावे आहेत. तालुक्याची लोकसंख्या ३ लाखाच्या आसपास आहे. एवढ्या मोठ्या तालुक्यातील आरोग्य समस्या सोडविण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयाची आवश्यकता कितीतरी वर्षापासून होती. प्रदीर्घ काळ मागणी केल्यानंतर सन २०१३ मध्ये शासनाने ‘त्या’ मागणीला मान्यता दिली. परंतु शासनाच्या आरोग्य विभागाची म्हैैस चिखलात फसली. अद्याप ती निघाली नाही. अनेक लोकप्रतिनिधी आले व गेले परंतु कोणीही चामोर्शीच्या आरोग्यसेवेला गांभीर्याने घेतले नाही.
चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात मे २०२० या एका महिन्यात ४ हजार २०८ बाह्य रूग्ण, २२४ आंतररूग्ण भरती होते. गरोदर माता ८२, प्रसूती झालेल्या महिला ३३, विविध लसीकरण ७७, प्रथम सिझर प्रसूती १, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे ६० रूग्ण दाखल होते. एवढ्या रूग्णसंख्येसाठी केवळ ३० खाटांचे रूग्णालय कसे सांभाळत असेल, याची कल्पना न केलेली बरी. अनेक कंत्राटी वैैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चामोर्शी तालुक्याची आरोग्य सेवा सुरू आहे. कार्यरत कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थायी होण्यासाठी अनेकदा आंदोलने केली. अजुनही लढा सुरूच आहे. अस्थायी कर्मचाºयांना न्याय देऊन चामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

दोन रूग्णवाहिकांची आवश्यकता
चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात अ‍ॅडव्हॉन्स लाईफ सपोर्ट १०८ व बीएससी-१०८ अशा दोन रूग्णवाहिकांची गरज आहे. त्यामुळे शासनाने सदर दोन्ही रूग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी चामोर्शीकरांनी केली आहे. यासाठी पुढाकाराची गरज आहे.

Web Title: Chamorshi sub-district hospital is in a state of disrepair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.