विविध मागण्यांसाठी सुभाषनगर येथे चक्काजाम आंदोलन
By Admin | Updated: December 7, 2014 22:51 IST2014-12-07T22:51:31+5:302014-12-07T22:51:31+5:30
अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्याबरोबरच या परिसरातील समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने

विविध मागण्यांसाठी सुभाषनगर येथे चक्काजाम आंदोलन
अहेरी : अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्याबरोबरच या परिसरातील समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुभाषनगर येथे दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
जिमलगट्टा, जारावंडी, कसनसूर, गट्टा, कमलापूर, पेरमिली, आष्टी, आसरअल्ली या नवीन तालुक्यांची निर्मिती करावी, हिवाळी अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ घोषित करावा, अहेरी सिरोंचा शहरांना नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा, आलापल्ली-अहेरी-कागजनगर रेल्वे लाईन सुरू करावी, देवलमरी सिमेंट उद्योग, सुरजागड लोह पोलाद उद्योग स्थापन करावे, मुलचेरा येथील चेन्ना सिंचन प्रकल्प सुरू करावा, अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा तालुक्यात अखंडीत विद्युत पुरवठा करण्यासाठी २४० केव्हीचे विद्युत केंद्र सुरू करावे, लगाम येथे ३३ केव्हीचे विद्युत केंद्र सुरू करावे, सुभाषनगर, आलापल्ली येथील पाणी समस्या सोडविण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात यावी, चेन्ना सिंचन प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करावे, पर्लकोटा, गडअहेरी दिना नदीवरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, आशा वर्करला ५ हजार रूपये मानधन देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी सुभाषनगर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन तास चक्काजाम केल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली. आंदोलकांची आक्रमकता लक्षात घेऊन नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी घटनास्थळ गाठून आंदोलकांचे मागण्या ऐकून घेतल्या त्यानंतर निवेदन स्वीकारले. आंदोलनाचे नेतृत्व अहेरी जिल्हा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, अतुल उईके, पवन कोसरे, राहुल मडावी, अतुल नागूलवार, सुनील मडावी, निमकर कुमरे, राकेश मेश्राम, राजू तोरेम, मंगेश आत्राम, संयज आत्राम, संजय मडावी, सुरेश सडमेक, राकेश तोरेम, संतोष कुळमेथे, बाजीराव कुमरे, सलमान शेख, इमाम शेख, वाजिद शेख, निसार शेख, नुस्तफा शेख, चैकी तलांडे यांनी केले. आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले. (प्रतिनिधी)