तलाव साैंदर्यीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:37 IST2021-03-31T04:37:07+5:302021-03-31T04:37:07+5:30
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...

तलाव साैंदर्यीकरण करा
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाकडी-लखमापूर बोरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून, या रस्त्यांची अवस्था बकाल झाली आहे. वारंवार तक्रार करूनही संबंधित प्रशासकीय यंत्रणेने दुरुस्तीच्या कामाकडे कानाडोळा केला आहे.
तलावाचे सौंदर्यीकरण करा
चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही, त्यामुळे तलावाचे सौंदर्यीकरण करावे.
कॅम्प एरियात नळांना सर्रास टिल्लूपंप
गडचिरोली : शहरातील कॅम्प एरियात घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचले जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नळ जोडणीची तपासणी करण्याची गरज आहे. मोटार लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
भामरागड : ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. कियर, बेजूरसह अन्य गावांतील सौरदिवे केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास गावांच्या अंतिम टोकांवर अंधार पसरलेला दिसून येतो.
सिरोंचा भागात अवैध वृक्षतोड सुरूच
भामरागड : तालुक्यात जंगलातून मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड करून तेलंगणा राज्यात तस्करी केली जाते. विशेष म्हणजे वन कर्मचाऱ्यांनी अनेकदा तस्करांवर कारवाई केली आहे; परंतु रात्रीच्या सुमारास ही तस्करी होत असल्याने वन विभागाला अधिक सजग असणे आवश्यक आहे.
जळाऊ लाकडाचा तुटवडा
कोरची : येथे विविध विभागांचे कर्मचारी, अधिकारी वास्तव्य करतात; परंतु त्यांना वेळेवर जळाऊ लाकडे उपलब्ध होत नाहीत. स्थानिक नागरिकांना वन विभाग सरपणासाठी लाकूड उपलब्ध करून देण्यास दिरंगाई करीत आहे. बहुतांश डेपोंवर जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी लाकडे उपलब्ध नाहीत.
सुरक्षा कवचाविना डीपी
कुरूड : देसाईगंज तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत आहेत. कोकडी, तुळशी, विसोरा, विहीरगाव आदी भागांत ही समस्या आहे. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे.
अपघात वाढले
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर भेंडाळाच्या बसस्थानकावर गतिरोधक उभारणे आवश्यक आहे. चामोर्शी-मूलमार्गे, तसेच आष्टीकडे जाणारी वाहने भरधाव जातात. मात्र, या ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. माेठे गाव असतानाही बसस्थानक नसल्याने या ठिकाणी अपघात वाढले आहेत.
मोकाट जनावरांचा हैदोस
जिमलगट्टा : गावातील मोकाट जनावरे रस्त्यावर बसून राहतात. नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर गावातील मोकाट जनावरे बसून राहत असल्यामुळे मार्ग घाण झाला आहे. जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्यामुळे तिथे त्यांचे शेण पडलेले असते.
पशुपालक झाले त्रस्त
अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र, पशुपालकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ते खरेदी करण्यासाठी कुणी पुढे येत नाही.
कुटुंब नियोजनाची गरज
मुलचेरा : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. पुरुषांमध्ये नसबंदीबाबत गैरसमज असल्याचे दिसते.
विश्रामगृह प्रलंबितच
कोरची : येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. सदर विश्रामगृहाची मागणी अद्यापही प्रलंबितच आहे. कोरची हे जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण आहे. या ठिकाणी विश्रामगृह बांधल्यास या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सोयीचे होणार आहे.
कोंडवाडा जीर्णावस्थेत
अहेरी : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काही कोंडवाड्यांचे छप्पर पूर्णपणे उडून गेले आहे. त्यामुळे या काेंडवाड्याची दुरुस्ती करण्याची मागणी आहे.
गंजलेले खांब धाेक्याचे
सिरोंचा : येथील अनेक वॉर्डांतील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी करण्यात आली होती. वारंवार मागणी करूनही स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
नूतनीकरणाची प्रतीक्षा
अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आलापल्ली-भामरागड मार्गावरील चंद्रा-ताडगावपर्यंतच्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदाराकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच रस्ता उखडला असल्याची ओरड परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे. नूतनीकरण करण्याची मागणी हाेत आहे.