गावातून होणार सिमेंट काँक्रिट रोड
By Admin | Updated: October 26, 2016 01:35 IST2016-10-26T01:35:50+5:302016-10-26T01:35:50+5:30
मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामाला प्रत्यक्ष यावर्षीपासून सुरुवात होणार आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण

गावातून होणार सिमेंट काँक्रिट रोड
मुख्यमंत्री सडक योजनेतून चेहरा बदलणार : जिल्ह्यात यावर्षी ७७ किमीच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता
गडचिरोली : मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामाला प्रत्यक्ष यावर्षीपासून सुरुवात होणार आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागातील रस्ते बांधण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. मुख्यमंत्री सडक योजनेचा एखादा रस्ता गावातून जात असल्यास तो रस्ता सिमेंट काँक्रिटचा बनविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्यात मागील वर्षीपासून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली आहे. सदर योजना पुढील पाच वर्षापर्यंत राबविण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात किमी किमीचे रस्ते बांधायचे याचे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र ग्रामसडक योजनेंतर्गत मुख्यत्वेकरून ग्रामीण व दुर्गम भागातच रस्ते बांधले जातात.
गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा एखादा रस्ता गावातून जात असल्यास सदर रस्ता सुद्धा काँक्रिटीकरणाचाच करण्यात यावा, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत प्रामुख्याने खडीकरणाचे किंवा डांबरी रस्ते बांधले जातात. गावातून खडीकरण झाल्यास सदर रस्ता एका वर्षातच उखडून जाण्याची शक्यता राहते. त्यानंतर ग्रामपंचायतीला आणखी सिमेंट काँक्रिटीकरण करावे लागते. हा दुबार खर्च टाळण्याच्या उद्देशाने शासनाने सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते गावातून बांधण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नियोजन करून मुख्यमंत्री सडक योजना विभागाने रस्त्यांच्या कामांचे टेंडर काढले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये नियोजन करण्यात आलेले रस्ते बांधकामाला यावर्षीपासून सुरुवात होणार आहे. सुमारे ७७ किमीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. तर २०१६-१७ मधील टप्पा एकमध्ये ७५ किमीचे रस्ते बांधले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भाग अधिक आहे. बहुतांश रस्ते गावातूनच जात असल्याने शासनाच्या नवीन निर्णयाचा लाभ होणार आहे. त्यामुळे शासनाच्या या नवीन निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. (नगर प्रतिनिधी)