तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 20:57 IST2025-11-05T20:57:25+5:302025-11-05T20:57:57+5:30
एप्रिल ते जूनदरम्यान राज्यातील विविध स्तरांवरील चर्चांनंतर शांतता राखण्याबाबत सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर मे महिन्यात माओवाद्यांनी सहा महिन्यांची युद्धबंदी घोषित केली होती.

तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
गडचिरोली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) तेलंगणा राज्य समितीने युद्धबंदीला आणखी सहा महिन्यांसाठी वाढविण्याची घोषणा ५ नोव्हेंबरला केली आहे. मागील सहा महिन्यांपासून राज्यात प्रशासन, राजकीय पक्ष, तसेच सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शांततेचे वातावरण निर्माण झाले असल्याने हा निर्णय घेतल्याचे माओवाद्यांच्या तेलंगणा समितीचा प्रतिनिधी जगन याने तेलुगुतून जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
एप्रिल ते जूनदरम्यान राज्यातील विविध स्तरांवरील चर्चांनंतर शांतता राखण्याबाबत सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर मे महिन्यात माओवाद्यांनी सहा महिन्यांची युद्धबंदी घोषित केली होती. त्या कालावधीत प्रशासनाकडूनही योग्य सहकार्य मिळाल्याचे जगन याने सांगितले. मागील सहा महिन्यांत शांततेचे वातावरण राखण्यात सरकारने हातभार लावला. मात्र काही ठिकाणी शांतता भंग करण्याचे प्रयत्न होत असल्याची चिंता त्याने व्यक्त केली आहे. राज्य समितीने शांततेच्या या वातावरणाला पुढेही चालना देण्यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ स्वतःहून जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकारने शांततेचा भंग करणारी कोणतीही पावले उचलू नयेत, अशीही विनंती देखील केली आहे.
केंद्राच्या धोरणावर टीका करा, पण....
समितीने सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी, शिक्षक आणि व्यावसायिकांना शांतता प्रक्रियेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. तसेच केंद्र सरकारच्या धोरणांवर आवश्यक ती रचनात्मक टीका करावी, असेही त्याने पत्रकात नमूद केले आहे.