गुरांचा दवाखाना झाला गोठा
By Admin | Updated: May 27, 2015 01:35 IST2015-05-27T01:35:32+5:302015-05-27T01:35:32+5:30
नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम मुरुमगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

गुरांचा दवाखाना झाला गोठा
गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम मुरुमगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. विजेचा अभाव, सामानाची कमतरता आणि कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती यामुळे हा पशुवैद्यकीय दवाखाना नव्हे, तर गुरांचा गोठा आहे, अशी अवस्था झाली आहे.
धानोरा तालुक्यात धानोरा-राजनांदगाव या आंतरराज्यीय महामार्गावर मुरुमगाव वसलेले आहे. हे एक मोठे गाव असून, परिसरातील अनेक खेडे या गावाशी जोडलेले आहेत. मुरुमगाव येथे जिल्हा परिषदेंतर्गत एक पशुवैद्यकीय दवाखाना आहे. येथे एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु हे डॉक्टर नियमित सेवा देत नाही, अशी लोकांची तक्रार आहे.
दवाखान्यात जनावरांवर उपचारासाठी लोखंडी कठडा नाही. ही भीषण परिस्थिती असताना जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाच वेळा या दवाखान्याला भेटी देऊनही तेथे सुविधा पुरविण्याबाबत उपाययोजना केली नाही. १९६६ मध्ये या दवाखान्याची निर्मिती झाली असून, पुढील वर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. सुवर्ण महोत्सवी वर्ष आले असताना दवाखाण्याला गुरांच्या गोठ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. याबाबत आमदार क्रिष्णा गजबे यांना अवगत केले असता त्यांनी संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तत्काळ वीज व अन्य सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.