सिझेरियनचा खर्च परवडेना? जननी सुरक्षा योजनेची घ्या मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 15:13 IST2024-12-28T15:07:32+5:302024-12-28T15:13:02+5:30
आर्थिकदृष्ट्या दुर्बल गर्भवतींना लाभ : गरजूंना मिळतोय दिलासा

Can't afford the cost of a cesarean section? Take help from the Janani Suraksha Yojana
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत २००५-०६ यावर्षी सुरू केलेल्या जननी सुरक्षा योजनेंतर्गत गरीब व गरजू गर्भवतींना आर्थिक लाभ देण्यात येतो. घरी किंवा दवाखान्यात प्रसूती झाली तरीही महिलांना आर्थिक साहाय्य केले जाते. अनेकदा सिझेरियनचा खर्च आवाक्याबाहेर असतो. मात्र, या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना हातभार लागत आहे.
सुरुवातीला ही योजना फक्त ग्रामीण भागातील महिलांना देण्यात येत होती. मात्र, नंतर ती नागरी भागातही लागू करण्यात आली. या योजनेत दारिद्र्यरेषेखालील तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या गर्भवती मातांनाही आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे गरजूंना याचा आधार होत आहे.
'डीबीटी'द्वारे थेट खात्यात पैसे
- जननी सुरक्षा योजनेंतर्गत थेट गर्भवती मातांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात.
- अर्ज घेतानाच सोबत बँक अकाउंट, आधारकार्ड व इतर तपशील घेतला जातो. त्यानंतर डीबीटीद्वारे बँक खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे यात पारदर्शकता आहे.
माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी योजना
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील गरीब महिलांचे आरोग्य संस्थांमध्ये होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण वाढविणे व माता व अर्भक मृत्यू रोखणे.
अटी व शर्ती काय?
- दारिद्रयरेषेखालील सर्व लाभार्थी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सर्वे गर्भवती माता (दारिद्र्यरेषेखाली नसलेल्यादेखील)
- सदर लाभार्थी महिलेचे वय प्रसवपूर्व नोंदणी करताना कमीत कमी १९ वर्षे असावे. सदर योजनेचा लाभ दोन जिवंत अपत्यांपर्यंतच देय राहील.
अर्ज कुठे करायचा?
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, नगरपालिका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, शासनमान्य खाजगी रुग्णालये या ठिकाणी योजनेचा लाभ देण्यात येतो.
किती रुपये मिळतात?
शहरी भाग - ६०० रुपये
ग्रामीण भाग - ७०० रुपये
सिझेरियन - १५०० रुपये
जननी सुरक्षा योजनेचे लाभार्थी
प्रवर्ग लाभार्थी लाभ वितरित लाभार्थी
एस.सी. ७८३ ७०८
एस.टी. ३५८८ ३२८२
बीपीएल ११७२ १०८४
एकूण ५५४३ ५०७४
"राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आहेत. शासकीय रुग्णालयांसह घरी प्रसूत झालेल्या महिलांनाही याद्वारे लाभ देण्यात येत आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब तसेच गरजू कुटुंबांना यामुळे आधार मिळत आहे. या मातांसह बाळांच्या आरोग्याची देखील व्यवस्थित काळजी घेतली जात आहे."
- डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली