विद्यार्थ्यांवर दप्तराचे ओझे कायमच
By Admin | Updated: July 9, 2017 02:26 IST2017-07-09T02:26:36+5:302017-07-09T02:26:36+5:30
अधिक वजनाच्या दप्तरांमुळे विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसीक व्याधी जडण्याची शक्यता असल्याने

विद्यार्थ्यांवर दप्तराचे ओझे कायमच
शासनाच्या निर्णयाला शाळा व पालकांची बगल : गडचिरोली, आरमोरी व धानोरा येथे विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वजन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/आरमोरी/धानोरा : अधिक वजनाच्या दप्तरांमुळे विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसीक व्याधी जडण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे त्याच्या एकूण वजनाच्या १० टक्केपेक्षा अधिक नसावे, असे निर्देश शासनाने दिले असले तरी शाळा व शिक्षण विभाग याची अंमलबजावणी करीत नसल्याने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे शासनाने ठरवून दिलेल्या वजनापेक्षा कित्येक पटीने अधिक असल्याचे लोकमतने गडचिरोली, आरमोरी व धानोरा येथे शनिवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान दिसून आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे अधिक झाल्यास मुलांमध्ये पाठदुखीचा त्रास होणे, सांधे आखडणे, स्नायू आखडणे, मनक्याची झिज होणे, मान दुखणे, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण येणे, डोकेदुखी यासाखरे आजार होऊ शकतात. याचा विपरित परिणाम मुलांच्या शारीरिक वाढीवर होतो. बालवयात विद्यार्थ्यांच्या शरीरावर होणाऱ्या अनिष्ट परिणांमुळे भविष्यातही त्यांना अनेक शारीरिक व मानसिक व्याधी जडू शकतात. शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या अनुषंगाने दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार दप्तराचे वजन विद्यार्थ्याच्या वजनापेक्षा १० टक्केपेक्षा अधिक असू नये. या नियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांनी सुध्दा अधूनमधून शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन १० टक्के राहिल. याबाबतच्या सूचना द्यायच्या आहेत. मात्र शिक्षण विभाग दप्तरांच्या ओझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाने निर्णय घेतला असला तरी दप्तराचे ओझे अजूनपर्यंत कमी झाले नाही. लोकमत प्रतिनिधींनी आरमोरी, गडचिरोली व धानोरा येथील शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांचे वजन केले. यावेळी विद्यार्थ्यांचे वजन दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. शिक्षण विभागाने याची दखल घेण्याची गरज आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये मध्यान्ह भोजन दिले जाते. तेथील विद्यार्थी टिपीन व पाण्याची बॉटल फार क्वचित नेतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तुलनेत कमी राहते. या शाळांवर विशेष लक्ष ठेवण्याची मागणी आहे.
शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष
दप्तराचे ओझे कमी करण्यात शाळा प्रशासनाचा मोलाचा वाटा राहतो. त्यामुळे शाळेने दप्तराच्या वजनाबाबत दक्ष असणे आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थी जेवनाचा डब्बा घेऊन जातात. डब्ब्यासोबतच पाण्याची बॉटलही ठेवली जाते. बॉटलमधील पाण्याचे वजन अर्धा ते एक किलो होते. त्यामुळे शाळेने शक्यतोवर शुध्द पाण्याची व्यवस्था शाळेतच करावी, पाठ्यापुस्तकांव्यतिरिक्त जाड पुठ्यांच्या फूलस्केप वह्या, प्रयोग वह्या, अधिक पानांच्या वह्या, अनावश्यक लेखन साहित्य, चित्रकला साहित्य, डिक्शनरी, रायटींग पॅड, खासगी प्रकाशनाचे पुरक साहित्य, शिकवणीचे दप्तर, स्वाध्याय पुस्तिका, खेळाचे साहित्य, सौंदर्य प्रसाधने आणण्यावर प्रतिबंध घातल्यास दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल.
शाळेत ई-लर्निंगचा वापर वाढावावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुस्तके आणण्याची गरज पडणार नाही. मुख्याध्यापकांनी अधूनमधून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन करावे.