अपंग नातवाचा भार आंधळ्या आजोबावर
By Admin | Updated: November 2, 2016 01:16 IST2016-11-02T01:16:46+5:302016-11-02T01:16:46+5:30
आधिच मरकट, त्यात विंचू चावला, वरून विषबाधा झाली, असा दारिद्र्याचा चढता क्रम विधवा वंदना वसंत लांजीकरच्या संसाराचा आहे.

अपंग नातवाचा भार आंधळ्या आजोबावर
लांजीकर कुटुंबाची कहानी : मोलमजुरी करून जगवावे लागते कुटुंब
वैरागड : आधिच मरकट, त्यात विंचू चावला, वरून विषबाधा झाली, असा दारिद्र्याचा चढता क्रम विधवा वंदना वसंत लांजीकरच्या संसाराचा आहे. अपंग नातवाला सांभाळण्याचा भार अंध व बहिरा असलेल्या वयोवृद्ध आजोबाला सांभाळावा लागत आहे.
वैरागड येथील वंदना वसंत लांजीकर या विधवा महिलेच्या गरीब कुटुंबाची कहानी कोणत्याही संवेदनशील माणसाच्या हृदयाला पाझर फोडणारी आहे. वंदना वसंतच्या पोटी जन्माला आलेला राकेश हा दोन्ही पायांनी अपंग आहे. त्याचबरोबर आंधळासुद्धा आहे. राकेश घराबाहेर पडला की, सूर्यकिरणांना शोधावा तसा एकसारखा सूर्याकडे पाहत राहतो. त्याला घास भरविण्यापासून बाकी सेवा आजोबा व आईला करावी लागते. पतीच्या निधनाने वंदनाच्या गरिबीचा अंधार आणखी गडद झाला. राकेशचा वृद्ध आजोबा, वृद्ध आजी, अपंग राकेश व राकेशची लहान बहीण या तिघांचाही सांभाळ वंदनाला करावा लागतो. स्वत:च्या मालकीची जमतेम अर्धा एकर जमीन आहे. घरात कुणीही कमावता माणूस नाही. राकेशचे आजोबा काशिनाथ शरीरात त्राण असेपर्यंत अंधूक असताना काम करीत होते. आता मात्र शरीर साथ देत नाही. त्यामुळे वृद्ध काशिनाथसुद्धा मोलमजुरी करू शकत नाही. शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ विधवा वंदना लांजीकरला व आंधळ्या काशिनाथ लांजीकरला मिळत असला तरी तुटपुंज्या आर्थिक उत्पन्नावर संसाराचा गाडा हाकलने कठीण होते. शेतीवर मोलमजुरी करून वंदना वृद्ध सासू-सासरे, मुलगा राकेश व लहान मुलीला घास भरवित आहे. (वार्ताहर)