शौचालय-मूत्रीघर बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST2021-05-14T04:35:53+5:302021-05-14T04:35:53+5:30

चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी बसथांब्यावर भेंडाळा, मूल, चामोर्शी, आष्टी, गोंडपिंपरी व चपराळा आदी ठिकाणासाठी दररोज बसेस जातात. ...

Build a toilet-urinal | शौचालय-मूत्रीघर बांधा

शौचालय-मूत्रीघर बांधा

चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी बसथांब्यावर भेंडाळा, मूल, चामोर्शी, आष्टी, गोंडपिंपरी व चपराळा आदी ठिकाणासाठी दररोज बसेस जातात. या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे शौचालय व मूत्रीघर उभारण्यात यावे, अशी मागणी आहे.

आरमाेरीत नाल्या तुंबल्या

आरमाेरी : शहरातील विविध वॉर्डात अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे.

गॅस रिफिलिंग व्यवस्थेत सुधारणा करा

देसाईगंज : वनविभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापनचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र गॅस रिफिलिंगची व्यवस्था मोठ्या गावात दूर अंतरावर ठेवण्यात आली आहे.

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

गडचिरोली : सततच्या विजेच्या लपंडावामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. दिवसातून आठ ते दहा वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरातील विद्युत उपकरणे खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

लाहेरीत नवीन आराेग्य केंद्राची इमारत बांधा

भामरागड : तालुक्यातील लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारती अभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण दररोज येतात. सदर आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम सुरू करावे.

निवाऱ्याअभावी हाल

धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथे नवीन प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तोट्यांअभावी पाणी वाया

वैरागड : येथील नागरिकांकडे नळ आहेत. परंतु काही नागरिकांच्या नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे ओव्हरफ्लो झाल्यानंतर तसेच पाणी भरून झाल्यानंतर उर्वरित पाणी वाया जाते. स्थानिक प्रशासनाने प्रत्येक नागरिकांच्या नळाला तोट्या लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी होत आहे.

गंजलेले खांब धाेक्याचे

धानाेरा : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे खांब बदलविण्याची मागणी होत आहे. गंजलेल्या वीज खांबाजवळ मुले खेळत असतात. स्थानिक प्रशासनाने गंजलेले खांब बदलवावे.

पाण्याचा अपव्यय

देसाईगंज : शहरात सार्वजनिक ठिकाणी केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या नळांना बऱ्याच ठिकाणी तोटी नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी विनाकारण वाहून जात आहे. वाॅर्डांमध्ये होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तत्काळ तोटी बसविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दुग्ध योजना राबवा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या घटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होत चालले आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात ७५ पेक्षा अधिक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र त्यातील ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. त्यामुळे दुग्ध याेजना राबवावी.

दत्तमंदिरात सुविधा द्या

आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे प्राचीन काळापासून दत्ताचे मंदिर आहे. मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. परंतु मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष असून मंदिर परिसरात सोयीसुविधा देण्याची मागणी होत आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष आहे.

वास्तूची दुरुस्ती करा

सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. अनेक वर्षांपासून मागणी केली जात असतानाही दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

लाभ मिळण्यास दिरंगाई

आलापल्ली : गर्भवती व प्रसूत झालेल्या मातांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही.

रोहित्रांचा धोका वाढला

गडचिरोली : ग्रामीण तसेच शहरातील बहुतांश शासकीय इमारतीच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या एखाद्या नागरिकाचा स्पर्श होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीने लक्ष घालून राेहित्र हटवावे, अशी मागणी आहे.

मुख्यालय सक्तीचे करा

धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत कर्मचारी दररोज अपडाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहातच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहात नाहीत. यामुळे कार्यालये ओस पडत आहेत.

दुधाळ गाईंचे वाटप करा

अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांना दुधाळ गाईचे वाटप करावे, अशी मागणी हाेत आहे.

Web Title: Build a toilet-urinal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.