आमगावच्या शेतीसाठी नवीन कालवा तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST2021-04-01T04:36:36+5:302021-04-01T04:36:36+5:30
इटियाडोह पाटबंधारे प्रकल्पांतर्गत देसाईगंज तालुक्यातील आमगावसाठी वैनगंगा उपकालव्यातून दक्षिण ते उत्तर वाहिनी सुमारे ९ किलोमीटर अंतरावरून वितरिका तयार करण्यात ...

आमगावच्या शेतीसाठी नवीन कालवा तयार करा
इटियाडोह पाटबंधारे प्रकल्पांतर्गत देसाईगंज तालुक्यातील आमगावसाठी वैनगंगा उपकालव्यातून दक्षिण ते उत्तर वाहिनी सुमारे ९ किलोमीटर अंतरावरून वितरिका तयार करण्यात आली. सदर वितरिकेचे अंतर लांब आहे व देखभाल दुरुस्तीअभावी शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने येथील शेतकऱ्यांना अपुऱ्या सिंचन सुविधेचा नेहमीच फटका बसत आहे. आमगाव पाणी वापर संस्था, आमगावकडून गट क्रमांक ९७ मधून दीड कि. मी. अंतराची नवीन वितरिका तयार करण्याची येथील शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून मागणी आहे. पुनर्वसित नवीन लाडज व आमगाव येथील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांत उंच टोकावर व सर्वांत जवळ असलेल्या भूमापन क्रमांक ८०८ पासून केवळ एक कि. मी. अंतरावर असलेल्या वैनगंगा उपकालवा कि. मी. १२४०० निरीक्षण पथ यावर नवीन नहर दिल्यास दोन्ही गावांतील प्रत्येक शेतकऱ्याला सिंचनाची सोय उपलब्ध होईल. जवळपास ३०० शेतकऱ्यांनी १९९२ पासून केल्या जाणाऱ्या मागणीचा संदर्भ देऊन सामूहिक आत्महत्येचा इशारा ११ ऑक्टोबर २००८ला संबंधित कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून दिला होता. त्यानुसार नागपूर येथील अधीक्षक अभियंता व प्रशासक यांनी नवीन नहराचा प्रस्ताव प्राधिकरणकडे सादर करण्याचे निर्देश ३ जानेवारी २००९ ला देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आमगावचे माजी सरपंच योगेश नाकतोडे यांनी नवीन वितरिका तयार करण्याच्या संदर्भात गोंदिया येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन सादर करून मागणी केली आहे.