रेल्वेला मजबूत करणारा अर्थसंकल्प
By Admin | Updated: February 26, 2016 01:52 IST2016-02-26T01:52:09+5:302016-02-26T01:52:09+5:30
केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गुरूवारी संसदेत सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पावर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहे.

रेल्वेला मजबूत करणारा अर्थसंकल्प
जिल्ह्यातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया : निधीची तरतूद न झाल्याने रेल्वे मार्गाचे काम रखडेल
गडचिरोली : केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गुरूवारी संसदेत सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पावर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद होणे आवश्यक होते. परंतु केवळ घोषणाबाजीच सुरू आहे. निधीचा पत्ता नाही, अशीही टीका काँग्रेसने केली आहे. तर हा अर्थसंकल्प रेल्वेला मजबूत करणारा असल्याचे खा. अशोक नेते यांनी म्हटले आहे.
रेल्वे अर्थसंकल्प गतवर्षीच्या अर्थसंकल्पाला पुढे नेणारा व भारतीय रेल्वेला खऱ्या अर्थाने मजबुतीकरणाकडे नेणारा आहे. या रेल्वे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आदिवासी, दलित, ओबीसी या सर्व समाज घटकांचा विचार करण्यात आला आहे. देशाच्या दुर्गम, अतिदुर्गम भागात रेल्वे विस्ताराचे कामही विचारात घेण्यात आले आहे. दररोज सात किमी लांबीचे मार्ग उभारणीचे उद्दिष्ट ठेवून रेल्वे वाटचाल करणार असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी घोषित केल्यामुळे प्रलंबित असलेले व गतवर्षीच्या अर्थसंकल्पात ८० कोटी रूपयांचा निधी मिळालेल्या वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गालाही गती मिळेल, असा विश्वास खा. अशोक नेते यांनी या रेल्वे अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया नोंदविताना व्यक्त केला. नव्या रेल्वे गाड्या जरी सुरू केल्या नसल्या तरी रेल्वेस्थानकाच्या फलाटाची उंची वाढविणे, मोठ्या रेल्वे स्थानकावर फूट ओव्हर ब्रिज बांधणे आदी कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील सर्व रेल्वेस्थानकाच्या विकास कामांना गती मिळेल, असेही खा. नेते म्हणाले.