वेतन न मिळाल्याने प्रशिक्षणावर बहिष्कार
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:42+5:302016-04-03T03:50:42+5:30
फेब्रुवारी २०१६ चे वेतन न झाल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या धानोरा पंचायत समितीमधील शिक्षकांनी ....

वेतन न मिळाल्याने प्रशिक्षणावर बहिष्कार
शिक्षक आक्रमक : धानोरा व चातगाव केंद्रावर मिळणार होते तंत्रस्नेही प्रशिक्षण; विभागाच्या दिरंगाईचा आरोप
धानोरा : फेब्रुवारी २०१६ चे वेतन न झाल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या धानोरा पंचायत समितीमधील शिक्षकांनी २ एप्रिल रोजी धानोरा व चातगाव येथे आयोजित केलेल्या शिक्षकांच्या तंत्रस्नेही प्रशिक्षणावर बहिष्कार टाकला. शिक्षण विभागाच्या दिरंगाई व आडमुठ्या धोरणामुळे शिक्षकांचे वेतन दर महिन्याला निश्चित वेळी होत नसल्याचा आरोपही यावेळी केला.
मागील एक वर्षापासून धानोरा पंचायत समितीतील शिक्षकांचे वेतन अनियमित होत आहे. वेतन नियमित करण्यात यावे, या मागणीसाठी तालुका शिक्षक संघटनांमार्फत वारंवार गटशिक्षणाधिकारी रमेश उचे व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर समस्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या. परंतु शिक्षकांच्या समस्यांकडे अधिकाऱ्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. संबंधित शाळांकडून आॅनलाईन देयके सादर केल्यानंतर सर्व शिक्षकांचे आॅफलाईन देयक तयार करणे ही शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामे असुनसुद्धा हेतुपुरस्सर देयक उशिरा तयार करणे व देयकात वारंवार चुका करणे या कारणांमुळे वेतन उशिरा होत आहे. परिणामी कर्जदार शिक्षकांना आर्थिक फटका बसत आहे. या सर्व कारणांमुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी फेब्रुवारी महिन्याचे वेतन मिळत नाही तोपर्यंत प्रशिक्षणावर बहिष्कार घालू, असा निर्णय घेतला. धानोरा येथील तीन व चातगाव येथील तीन केंद्रावर आयोजित प्रशिक्षणावर शिक्षकांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे धानोरा व चातगाव येथील शिक्षकांचे तंत्रस्नेही प्रशिक्षण रखडले आहे. आधी वेतन नंतरच प्रशिक्षण, असा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षक असहकार आंदोलन करणार
फेब्रुवारी महिन्याचे वेतन त्वरित निकाली न काढल्यास प्रशासनाविरोधात असहकार आंदोलन करू, असा इशारा शिक्षक समितीचे डी. डी. पेंदाम, शिक्षक परिषदेचे एल. बी. कावळे, प्राथमिक शिक्षक संघाचे आशिष धात्रक, कास्ट्राईब संघटनेचे दीपक भैसारे, कास्ट्राईब कल्याण महासंघाचे प्रदीप उईके व शिक्षकांनी दिला आहे.