'जल जीवन मिशन'च्या कामांना १० कोटींचे बुस्टर; २५ कोटी रुपयांची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:06 IST2025-03-20T16:04:39+5:302025-03-20T16:06:20+5:30
राज्य शासनाने दिला निधी : अर्धवट कामे आता मार्गी लागणार

Booster of Rs 10 crore for 'Jal Jeevan Mission' works; Rs 25 crore required
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वर्षभरापासून निधी नसल्याने जल जीवन मिशनची कामे काही प्रमाणात प्रभावित झाली होती. काही कंत्राटदारांनी तर कामेच बंद पाडली होती. मात्र राज्य शासनाने जिल्ह्यातील कामांसाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शिल्लक असलेल्या कामांना पुन्हा गती मिळेल, अशी आशा आहे.
प्रत्येक घरी नळाने पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने जल जीवन मिशन ही योजना सुरू केली आहे. राज्य व केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवली जात आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत सुमारे १ हजार २०८ कामे सुरू आहेत. यात काही लघु योजना तर काही गावांमध्ये मोठ्या पाणी पुरवठा योजना आहेत. कंत्राट मिळाल्याबरोबर कंत्राटदारांनी कामाला सुरुवात केली. मात्र मध्यंतरी आलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे जल जीवन मिशनच्या कामांसाठी मिळणारा निधी थांबला होता. काही कंत्राटदारांनी स्वतःच्या बळावर काम पुढे रेटले; मात्र काहींनी कामच बंद ठेवले. शासनाकडून निधी मिळण्याची प्रतीक्षा करीत होते. आता निधी मिळाला असल्याने कामाला गती मिळेल, असा अंदाज आहे.
पाणी टंचाईवर होणार मात
सर्वच योजनांची कामे पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातील जवळपास २० टक्के घरांमध्ये नळांच्या सहाय्याने पाणी येणार आहे. त्यामुळे हातपंप व गावातील विहिरींवरील पाण्याचा भार कमी होणार आहे. एखाद्या दिवशी नळांना पाणी आले नाही, तर त्याच दिवशी हातपंपाचे पाणी वापरावे लागणार आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना बसणार नाही.
११२९ वर्षभर रखडला होता योजनांचा निधी
कामे पूर्ण झाली आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात एकूण १ हजार २०८ कामे हाती घेण्यात आली होती. केवळ ७९ कामे अर्धवट आहेत. अर्धवट कामेही आता पूर्ण होतील.
पाड्यांवर सौर ऊर्जेने पाणी
दुर्गम भागातील काही गावे अतिशय लहान आहेत. केवळ १० ते २० घरांची वस्ती असलेली गावे आहेत. अशा गावात कोट्यवधी रुपयांचा खर्च असलेली मोठी पाणी पुरवठा योजना बांधणे शक्य नाही. अशा गावात दुहेरी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे.
गावातील हातपंपाला पाणी पंप बसविण्यात आला आहे. सदर पंप सौर ऊर्जेवर चालविला जात आहे. पंपाच्या सहाय्याने उपसलेले पाणी जवळच असलेल्या एका जवळपास दोन हजार लिटर क्षमतेच्या पाणी टाकीत टाकले जाते. आवश्यकता असल्यास हातपंपाचेही पाणी वापरता येत आहे.
पुन्हा २५ कोटींची गरज
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या कामांची गती अधिक आहे.
जिल्ह्यात सुमारे १ हजार २०८ कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी सुमारे १ हजार १२९ कामे पूर्ण झाली आहेत.
केवळ ७९ कामे अर्धवट आहेत. या योजनेचे पूर्ण बिल देण्यासाठी पुन्हा २५ कोटी रुपयांची गरज आहे.