भाजपमध्ये उत्साह तर राकाँचे कार्यकर्ते बुचकळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST2019-11-24T06:00:00+5:302019-11-24T06:00:30+5:30
गेल्या काही दिवसातील दिल्ली-मुंबईतील घडामोडींमुळे आता भाजपची सत्ता राज्यात बसणार नाही या भावनेतून भाजपचे आमदार डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे यांनी मुंबईतून जड अंत:करणाने काढता पाय घेतला होता. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सत्तेत बसण्याची आशा पल्लवित झाल्याने उत्साहाचे वातावरण होते.

भाजपमध्ये उत्साह तर राकाँचे कार्यकर्ते बुचकळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शुक्रवारच्या रात्री झालेल्या अनपेक्षित घडामोडी आणि सकाळी घाईघाईने उरकून घेतलेल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीने सर्वांनाच चक्रावून सोडले. भाजपचे आमदारही या घडामोडींबद्दल अनभिज्ञ होते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या घडामोडींचे भाजपने अतिषबाजी करून उत्स्फूर्त स्वागत केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिकाऱ्यांनी आपण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसातील दिल्ली-मुंबईतील घडामोडींमुळे आता भाजपची सत्ता राज्यात बसणार नाही या भावनेतून भाजपचे आमदार डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे यांनी मुंबईतून जड अंत:करणाने काढता पाय घेतला होता. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सत्तेत बसण्याची आशा पल्लवित झाल्याने उत्साहाचे वातावरण होते. पण शनिवारी सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून अनुक्रमे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथग्रहण केल्याचे वृत्त झळकताच खळबळ निर्माण झाली. या वृत्ताची खातरजमा केल्यानंतर भाजपच्या पदाधिकाºयांनी इंदिरा गांधी चौकात तसेच चामोर्शी, देसाईगंज येथे दोन्ही आमदारांच्या कार्यालयासमोर आणि सिरोंचासह इतर काही तालुकास्थळी आतिषबाजी केली. राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाºयांनीही सुरूवातीला आपला पक्ष सत्तेत भागीदार झाल्याचा आनंद व्यक्त केला, पण काही वेळातच पक्षाची वेगळी भूमिका असल्याचे समजल्यानंतर त्यांनी शांत राहणे पसंत केले.
दरम्यान भाजपचे दोन्ही आमदार दुपारनंतर मुंबईकडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. राष्टÑवादीचे नेते आ.धर्मरावबाबा आधीच मुंबईत डेरेदाखल झाले असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
आम्ही पवार साहेबांसोबत
केवळ सत्तेत वाटा मिळण्यासाठी आम्ही पक्षाच्या भूमिकेकडे पाठ फिरवून वेगळी वाट निवडणार नाही. शरद पवार आमचे नेते आहेत. त्यांच्यावर आमची निष्ठा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आणि पक्षाच्या भूमिकेसोबत आहोत. ते पक्षाच्या हिताचाच निर्णय घेतील. - धर्मरावबाबा आत्राम, आमदार, अहेरी
लोकहितासाठी सरकार स्थापण्याची गरज होती
गेल्या महिनाभरापासून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीला सरकार स्थापन करणे जमले नाही. त्यामुळे अजित पवारांनी भाजपसोबत येण्याची भूमिका घेऊन स्थिर सरकारसाठी सहकार्य केले. राज्याची स्थिती बिकट असताना लोकहितासाठी लवकर सरकार स्थापन करणे गरजेचे होते. त्यामुळे झटपट झालेल्या घडामोडींचे आम्ही स्वागत करतो. आम्ही बहुमत सिद्ध करू याबद्दल विश्वास आहे.
- डॉ.देवराव होळी,
भाजप आमदार, गडचिरोली
राज्याला स्थिर
सरकार मिळणार
मुंबईत काल रात्रीपासून झालेल्या घडामोडी अनपेक्षित अशा नव्हत्या. जनतेचे भाजपला सर्वाधिक जागा देऊन सत्ता स्थापन्याचा संकेत दिला आहे. त्यामुळे शिवसेनेने साथ सोडली तरी कोणाच्यातरी साथीने राज्याला स्थिर सरकार देणे गरजेचे होते. बिकट परिस्थितीतील शेतकºयाला यामुळे लवकर दिलासा मिळू शकेल.
- कृष्णा गजबे,
आमदार, आरमोरी