विद्यापीठाच्या समित्यांवर भाजप कार्यकर्त्यांची नजर
By Admin | Updated: November 19, 2014 22:39 IST2014-11-19T22:39:03+5:302014-11-19T22:39:03+5:30
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आघाडी सरकारच्या काळात गोंडवाना विद्यापीठाच्या विद्ववत्त व व्यवस्थापन समित्यांच्या नियुक्त्या रखडल्या. या समितीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक

विद्यापीठाच्या समित्यांवर भाजप कार्यकर्त्यांची नजर
गडचिरोली : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आघाडी सरकारच्या काळात गोंडवाना विद्यापीठाच्या विद्ववत्त व व्यवस्थापन समित्यांच्या नियुक्त्या रखडल्या. या समितीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तसेच संस्थेतील प्राचार्यांनी आपली नाव शासनाकडे पाठविली होती. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी अखेरपर्यंत सदर समित्यांचे गठण केले नाही. राज्यात आता सत्तांतरण होऊन भाजप सरकार सत्तारूढ झाले आहे. त्यामुळे आता गोंडवाना विद्यापीठाच्या विद्ववत्त व व्यवस्थापन समित्यांसह अन्य समित्यांचे गठण होण्याची शक्यता आहे. या समित्यांवर भारतीय जनता पार्टी आपल्या पदाधिकाऱ्यांचीही वर्णी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याची सुत्रांची माहिती आहे. यापूर्वीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या समित्यांवर भाजप प्रणीत विविध शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकून काम केले आहे. यातील बरेच लोक आता या समित्यांवर नजर ठेवून आहेत. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातून भाजप आमदारांच्या शिफारशीने शासनाकडे आपली नाव पाठवून या समित्यांचे गठण तातडीने करण्यासाठी स्वत: भाजप पदाधिकारी सक्रीय झाले आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळातही त्यांचा प्रवेश होणार आहे.