भाजप सत्तेची मोठी मोट बांधण्याच्या तयारीत
By Admin | Updated: March 21, 2017 00:44 IST2017-03-21T00:44:30+5:302017-03-21T00:44:30+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक २१ मार्च रोजी होऊ घातली आहे.

भाजप सत्तेची मोठी मोट बांधण्याच्या तयारीत
बहुमताचे संख्याबळ ३४ पर्यंत वाढण्याची शक्यता
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक २१ मार्च रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अपक्षांची आघाडी झाली आहे. या आघाडीत आणखी आदिवासी विद्यार्थी संघालाही स्थान देण्याबाबत सोमवारी रात्री उशीरापर्यंत नागपुरात भाजप नेत्यांचे खलबत्ते सुरू होते. काँग्रेस वगळता सर्वांनाच सोबत घेऊन बहुमताचे संख्याबळ ३४ पर्यंत नेण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार असल्याचे हालचालीवरून दिसून येत आहे.
सोमवारी भाजपसह मित्र पक्षांच्या सर्व सदस्य व नेत्यांची नागपुरात बैठक झाली. ही बैठक बऱ्याच उशीरापर्यंत सुरू होती. या बैठकीत पूर्वी ठरल्यानुसार भाजप, राष्ट्रवादी व एक अपक्ष असे २६ चे संख्या बळ निश्चित होते. यात आणखी एका सदस्याची भर पडल्याची माहिती आहे. त्यामुळे हे संख्याबळ आता २७ वर पोहोचले आहे. याशिवाय रात्री उशीरापर्यंत आविसंला आपल्या सोबत घेण्याबाबत भाजपचे अनेक नेते आग्रही होते. पुढील दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन अहेरी विधानसभा क्षेत्रात आविसं आपल्या सोबत असायला हवा, अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या नागपूर स्थित पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे या नव्या मित्रावर व्यापक प्रमाणात चर्चा भाजपच्या गोटात सुरू होती. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने आविसंही सोबत येऊ शकतो, असे सूचक उद्गार लोकमतशी बोलताना काढले.
जिल्हा परिषदेत भाजपला २०, काँग्रेसला १५, आदिवासी विद्यार्थी संघाला सात, राष्ट्रवादी काँग्रेसला पाच, ग्रामसभांना दोन व दोन जागा रासपला मिळाल्या आहे. कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने बहुमताच्या २६ संख्याबळापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची जोरदार तयारी चालली आहे. त्यामुळे भाजपचाच अध्यक्ष गडचिरोली जिल्हा परिषदेवर विराजमान होणार हे निश्चित असले तरी सोमवारच्या दिवसभराच्या हालचालीवरून उपाध्यक्ष पद कुणाच्या पदरात पडते हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नव्हते. आदिवासी विद्यार्थी संघ सोबत आल्यास त्यांना काय पद दिले जातात. या साऱ्या बाबी गुलदस्त्यातच होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष सभागृहात भाजपचा बहुमताचा आकडा कितीपर्यंत पोहोचतो. हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)