जैवविविधता उद्यान व घनकचरा डेपोला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:37 IST2021-03-31T04:37:27+5:302021-03-31T04:37:27+5:30
येथील देसाईगंज मार्गावर असलेल्या वन विभागाच्या जैवविविधता उद्यान व नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन डेपोत सोमवारी दुपारदरम्यान ...

जैवविविधता उद्यान व घनकचरा डेपोला आग
येथील देसाईगंज मार्गावर असलेल्या वन विभागाच्या जैवविविधता उद्यान व नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन डेपोत सोमवारी दुपारदरम्यान आग भडकली. ही आग नेमकी कशासाठी लावण्यात आली हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. सोमवारी, दि.२९ ला सर्वत्र धूलिवंदन साजरे करून दुपारी सर्वजण आराम करीत असताना अचानक जैवविविधता उद्यानाला चारही बाजूने आग लागली. सदर आग वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही.
जैवविविधता उद्यानातील अनेक मौल्यवान वनसंपदा यात जळून खाक झाली.
त्याचप्रमाणे उद्यानापासून जवळच असलेल्या नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन डेपोलाही त्याच वेळी आग लागली. यामध्ये शहरातून जमा केलेला प्लास्टिक कचरा जळत होता. दोन्ही ठिकाणी एकाच वेळी आग लागल्याने त्याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. जैवविविधता उद्यानात चार-पाच वर्षांपूर्वी लाखो रुपयांची कामे वनविभागाच्या वतीने करण्यात आली. वेगवेगळ्या वनौषधींची व विविध जातींची झाडेही फळ व फुलझाडे लावण्यात आली. मात्र, ही सर्व मौल्यवान संपदा आगीत भस्म झाली. त्यामुळे लाखोंचा खर्च वाया गेला आहे. सदर आग नेमकी कुणी व कशासाठी लावली, याचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून केली जात आहे.