अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; पहाटे ३ वाजता घडली घटना
By संजय तिपाले | Updated: May 10, 2023 11:04 IST2023-05-10T11:04:19+5:302023-05-10T11:04:28+5:30
स्थानिकांनी असरअली पोलिस ठाण्यात माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी धाव घेतली

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; पहाटे ३ वाजता घडली घटना
गडचिरोली - सोमनपल्ली- सिरोंचा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना १० मे रोजी पहाटे तीन वाजता बालमृत्यमपल्ली गावाजवळ घडली.
प्रवीण पानेमा (२६, रा. सिरोंचा) असे मृत तरुणाचे नाव आहे. दुचाकीवरून (एमएच ३३ ई-३९५०) तो सोमनपल्ली येथून सिरोंचाला जात होता. बालमृत्यमपल्ली गावानजीक संमक्का सारक्का मंदिरासमोर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पहाटे साडेपाच वाजेपर्यंत त्याचा मृत्यूदेह रस्त्यावरच पडून होता.
स्थानिकांनी असरअली पोलिस ठाण्यात माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. दुचाकीजवळ मयताचे कपडे, चादर व ब्ल्यूटूथ पडलेले आढळले. पोलिसांनी दुचाकीसह साहित्य ताब्यात घेतले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नजीकच्या रुग्णालयात पाठविण्यात आला. तपास सुरू असल्याचे पोलिस निरिक्षक राजेश गावडे यांनी सांगितले.