मोठी बातमी: दोन जहाल माओवाद्यांनी ठेवले शस्त्र; आठ लाखांचे होते बक्षीस!

By संजय तिपाले | Updated: December 20, 2024 19:13 IST2024-12-20T19:12:47+5:302024-12-20T19:13:28+5:30

आत्मसमर्पण: ५५ वर्षीय नरसिंगवर डझनभर गुन्हे, पाच खुनांचाही आरोप

Big news Two Maoists laid down their weapons The reward was eight lakhs | मोठी बातमी: दोन जहाल माओवाद्यांनी ठेवले शस्त्र; आठ लाखांचे होते बक्षीस!

मोठी बातमी: दोन जहाल माओवाद्यांनी ठेवले शस्त्र; आठ लाखांचे होते बक्षीस!

संजय तिपाले /गडचिरोली : जवानांवर बेछुट गोळीबार करणे, निरपराध लाेकांचे खून करुन दहशत निर्माण करणे, असे आरोप असलेल्या ५५ वर्षीय तसेच पाच वर्षांपासून गुन्हे चळवळीसाठी काम करणाऱ्या २५ वर्षीय जहाल माओवाद्याने २० डिसेंबरला जिल्हा पोलिस दलापुढे शरणगती पत्कारली. दोघांवर मिळून एकूण आठ लाखांचे बक्षीस होते.

एरिया कमिटी मेंबर रामसू दुर्गू पोयाम ऊर्फ नरसिंग ( ५५, रा. गट्टानेली, ता. धानोरा) व दलम सदस्य रमेश शामू कुंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित (२५ , रा. वेडमेट्टा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) अशी आत्मसमर्पित माओवाद्यांची नावे आहेत. नरसिंग याच्यावर सहा लाख रूपयांचे तर रमेश कुंजामवर दोन लाखांचे बक्षीस होते. आत्मसमर्पण योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून आता या दोघांना प्रत्येकी साडेचार लाख रुपये प्रोत्साहन निधी मिळणार आहे. नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा , पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ ३७ बटालीयनचे प्रभारी समादेशक सुजीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण झाले.
 
अशी आहे गुन्हे कारकीर्द
रामसू दुर्गू पोयाम ऊर्फ नरसिंग हा १९९२ पासून माओवादी चळवळीत आहे. १९९२ मध्ये तो टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला.१९९५ मध्ये काकुर दलममध्ये राहुन सन १९९६ पर्यंत माओवाद्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरक्षा देण्याचे काम तो करीत होता. पुन्हा तो टिपागड दलमसाठी काम करु लागला. पुढे माड एरिया (छत्तीसगड) येथे बदली होऊन २००१ पर्यंत त्याने पुरवठा टीममध्ये काम केले. २०१० पासून तो कुतुल आणि नेलनार दलममध्ये एरिया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत होता. त्याच्यावर १२ गुन्हे नोंद असून ६ चकमक, ५ खून, १ दरोडा प्रकरणात त्याचा सहभाग राहिलेला आहे. रमेश शामू कुंजाम हा २०१९ पासून माओवादी चळवळीत आहे. चेतना नाट¬ मंच ,कुतुल दलममध्ये सदस्य म्हणून तो काम करत होता. त्याच्या गुन्हेकृत्याची पडताळणी सुरु आहे.
 
चालू वर्षात २० माओवाद्यांचे आत्मसमर्पण 
चालू वर्षात आतापर्यंत २० माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. २०२२ पासून आतापर्यंत आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांची संख्या ३३ झाली आहे.  माओवाद्यांनी गुन्हे चळवळ सोडून आत्मसमर्पण करुन लोकशाही मार्ग स्वीकारावा , असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

Web Title: Big news Two Maoists laid down their weapons The reward was eight lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.