भेंडाळाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:41 IST2021-05-25T04:41:10+5:302021-05-25T04:41:10+5:30

तक्रारीनुसार, चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. विजय साबणे हे अनेकदा आपल्याच कर्मचाऱ्यांसोबत भांडण करीत ...

Bhendal's medical officer treats staff rudely | भेंडाळाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तणूक

भेंडाळाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तणूक

तक्रारीनुसार, चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. विजय साबणे हे अनेकदा आपल्याच कर्मचाऱ्यांसोबत भांडण करीत असतात. तसेच कोणतेही नियोजन नसल्याने आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णाची हेळसांड होत असते. दवाखान्यात मास्क, हातमोजे, सॅनिटायझर यासारख्या आवश्यक वस्तू कमी पडल्या तर त्या वस्तू तालुका स्तरावरून न बोलविणे, कोणत्याही प्रकारच्या नियोजनाशिवाय लसीकरण सुरू असणे यामुळे डाॅ. साबणे यांच्या कारभाराबद्दल कर्मचाऱ्यांनी असंतोष व्यक्त केला.

१९ मे रोजी प्रा. आ. केंद्र भेंडाळाअंतर्गत जयनगर या गावात कोविड लसीकरण सत्र आयोजित केले होते. सदर सत्रासाठी याच आरोग्य केंद्रातील महिला कर्मचाऱ्यासह इतर कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन गावांतील नागरिकांचे लसीकरण करीत होते. जवळपास ७० ते ८० लोकांचे ऑनलाईन डाटा एंट्री करून लसीकरण पूर्ण करण्यात आले. दुपारी अडीच वाजता डॉ. विजय साबणे हे नशेत तिथे आले व सरपंच, ग्रामसेवक तसेच गावांतील लोकांसोबत कडाक्याचे भांडण केले. लसीकरण पूर्ण न करताच आरोग्य केंद्रातील पथकाला आपल्यासोबत जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन भेंडाळाला आणले.

(बॉक्स)

नक्षलवादी आणून मारण्याची धमकी

जयनगर येथे भांडण करून परत येताना गाडीमध्ये जे आरोग्य पथकातील कर्मचारी होते, त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. एवढेच नाही तर तुम्हाला नक्षलवादी आणून मारून टाकीन, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भीतीपोटी समस्त कर्मचारी धास्तावले असून, अशा वातावरणात ड्युटी करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

(कोट)

डॉ. विजय साबणे यांच्याविरोधात आपल्याकडेही अनेकदा तक्रारी आल्या; पण आता त्यांनी हद्दच पार केली. अशा व्यक्तीची या आरोग्य केंद्रातून लवकरात लवकर बदली करावी, असा प्रस्ताव आपण जिल्हा परिषदेच्या मासिक बैठकीत ठेवणार आहे.

- कविता भगत, जि. प. सदस्य

या घटनेमध्ये मी कोणत्याही महिला कर्मचाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेली नाही. मी त्या वेळेस दारू पिऊन नव्हतो. मी नेहमीच महिला कर्मचारी असो किंवा पुरुष, त्यांच्यासोबत नम्रतेनेच बोलतो. माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत.

डॉ. विजय साबणे, वैद्यकीय अधिकारी

Web Title: Bhendal's medical officer treats staff rudely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.