भेंडाळातील सिंचन योजना रखडली
By Admin | Updated: September 7, 2016 02:21 IST2016-09-07T02:21:26+5:302016-09-07T02:21:26+5:30
तालुक्यातील भेंडाळा येथे उपसा जलसंचिन योजना निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी

भेंडाळातील सिंचन योजना रखडली
शासनाचे दुर्लक्ष : १३ गावातील हजारो शेतकऱ्यांना झाला असता लाभ
चामोर्शी : तालुक्यातील भेंडाळा येथे उपसा जलसंचिन योजना निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००१ साली पाटबंधारे विभागाचे अव्वल सचिव यांना दिले होते. त्याचबरोबर भेंडाळा येथे राजीव जलउपसा सहकारी संस्था सुद्धा निर्माण करण्यात आली. मात्र जवळपास १४ वर्षांचा कालावधी उलटूनही या योजनेचे काम पुढे जाऊ शकले नाही.
भेंडाळा येथील राजीव उपसा जलसिंचन सहकारी संस्था पंजीकृत करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आदेशानंतर आराखडा तयार करून सर्वे सुद्धा केला. या आराखड्यानुसार भेंडाळा, रामाळा, मार्र्कंडादेव, फराडा, घारगाव, दोटकुली, वाघोली, वेलतूर तुकूम, सगनापूर, एकोडी, कान्होली, फोकुर्डी, मोहुर्ली या १३ गावातील ५ हजार हेक्टर जमीन ओलीताखाली आणता येते. यासाठी मागील २० वर्षांपासून संस्थेच्या वतीने पत्रव्यवहार चालू आहेत. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहेत. योजनेच्या कामाला सुरुवात करावी, यासाठी विधीमंडळ व संसद अधिवेशन काळात गृहराज्यमंत्री खा. हंसराज अहीर, खा. अशोक नेते, माजी खा. नरेश पुगलिया यांना निवेदन देण्यात आली. मात्र लोकप्रतिनिधीसुद्धा याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे पाठपुरावा कुणाकडे करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे.
राजीव जल उपसा सिंचन सहकारी संस्थेचे श्रीरंग म्हशाखेत्री, राजू चुधरी, गुरूदेव डांगे, विजय पोरेड्डीवार, किशोर डांगे, गजानन वैरागडे हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत या योजनेला मंजुरी प्रदान करण्यात आली नाही. विद्यमान आ. डॉ. होळी यांच्याकडेसुद्धा सदर योजनेच्या निर्मितीबाबतचे निवेदन दिले होते. मात्र अजूनपर्यंत त्यांनी सुद्धा या योजनेकडे लक्ष घातले नाही. परिणामी योजनेचे काम रखडले आहे. (शहर प्रतिनिधी)
५ हजार हेक्टर क्षमता
भेंडाळा येथे उपसा जलसिंचन योजना झाली असती तर याचा लाभ परिसरातील १३ गावांना झाला असता, चामोर्शी तालुक्यात रेगडी तलावाचे पाणी येते. मात्र ही गावे शेवट पडत असल्याने या गावातील बहुतांश शेतांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे चांगली काळीकसदार जमीन पाण्याअभावी पडिक ठेवावी लागत आहे. या योजनेमुळे सदर जमीन ओलिताखाली आली असती.