भामरागडचा संपर्क तुटलेलाच, गडचिरोलीतील आठ मार्ग पुरामुळे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:54 IST2025-08-21T18:53:58+5:302025-08-21T18:54:33+5:30

जनजीवन विस्कळीत : दक्षिण भागातील नदी-नाले फुगलेले, एसटीच्या बसफेऱ्याही प्रभावित

Bhamragad connection is lost, eight roads in Gadchiroli closed due to floods | भामरागडचा संपर्क तुटलेलाच, गडचिरोलीतील आठ मार्ग पुरामुळे बंद

Bhamragad connection is lost, eight roads in Gadchiroli closed due to floods

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार तर कुठे जोरदार पाऊस येत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. बुधवारी दुपारपासून पावसाने उसंत दिली असली तरी भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुरामुळे सलग दुसऱ्याही दिवशी जिल्हा मुख्यालयाशी तालुक्याचा संपर्क तुटलेलाच होता. याशिवाय जिल्ह्यातील प्रमुख आठ मार्ग पुरामुळे सायंकाळपर्यंत रहदारीसाठी बंदच होते.


जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. मंगळवारीही संततधार पाऊस येतच होता. बुधवारी सकाळीसुद्धा काही भागांत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. संततधार पावसामुळे भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. पर्लकोटा नदीला आलेल्या पुराचे पाणी मंगळवारी भामरागड मुख्यालयातील २५ दुकाने व घरांमध्ये शिरले. बुधवारी सकाळपासून पावसाने उसंत दिली. त्यामुळे पूर ओसरण्यास सुरुवात झाली. वस्तीतील पाणी ओसरले. मात्र, सायंकाळी ७वाजेपर्यंत पुलावर पाणी कायम होते. 


कढोलीत वाहून गेलेल्या व्यक्तीला वाचविले
कुरखेडा तालुक्याच्या कढोलीजवळच्या नाल्यात सोनेरांगी येथील एक व्यक्ती मंगळवारी सायंकाळी वाहून गेली. मात्र, नागरिकांनी सतर्कता बाळगून त्या व्यक्तीला वाचविले. हरिदास बावनथडे (रा. सोनेरांगी) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. हरिदास बावनथडे हे बुधवारी काही कामानिमित्त कढोली येथे आले होते. सायंकाळी ते सोनेरांगी येथे परत पायी जात होते. नाल्याला आलेल्या पुरातून ते वाट काढत असतानाच ते तब्बल अर्धा किमी वाहून गेले होते.


सिरोंचासाठी बोलावले पथक
तेलंगणातून वाढलेल्या विसर्गामुळे सिरोंचा तालुक्यात प्राणहिता आणि गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली. मात्र पूरस्थिती नियंत्रणात होती. खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागपूर येथून 'एनडीआरएफ'चे पथक बोलावले. बुधवार पहाटे ५ वाजता हे पथक आले.


३२.७ वैनगंगा, गोदावरीचा जलस्तर धोक्याच्या पातळीवर
मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात बुधवारी मागील २४ तासांत करण्यात आली. यापैकी चार मंडळांमध्ये जोरदार पाऊस पडला. यात ताडगाव, एटापल्ली, भामरागड, आरमोरी यांचा समावेश आहे.


पुरामुळे या मार्गावरील रहदारी बंद

  • हेमलकसा- भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्लकोटा नदी)
  • सिरोंचा आसरअल्ली-जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग (सोमनपल्ली नाला)
  • अहेरी-वटरा राज्यमार्ग (वटरा नाला)
  • चौडमपल्ली-चपराळा मार्ग (स्थानिक नाला)
  • भेंडाळा-बोरी-गणपूर मार्ग (हळदीमाल नाला)
  • हलवेर-कोठी मार्ग
  • मनेराजाराम-दामरंचा मार्ग (बांडिया नदी)
  • कोपेला-झिंगानूर मार्ग

Web Title: Bhamragad connection is lost, eight roads in Gadchiroli closed due to floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.