७३ हजार शिक्षकांना विनाअनुदानित सेवेचा लाभ
By Admin | Updated: May 11, 2014 00:20 IST2014-05-11T00:20:23+5:302014-05-11T00:20:23+5:30
विनाअनुदान काळातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्यांची सेवा वेतननिश्चिती, पदोन्नती, पेंशन आणि सेवाज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय नुकताच ...

७३ हजार शिक्षकांना विनाअनुदानित सेवेचा लाभ
गडचिरोली : विनाअनुदान काळातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्यांची सेवा वेतननिश्चिती, पदोन्नती, पेंशन आणि सेवाज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे विनाअनुदानित काळातील सेवेचा ७३ हजार शिक्षकांना लाभ मिळणार आहे. माध्यमिक शिक्षकांना डिसेंबर २००६ पासून याचा लाभ मिळत होता. कनिष्ठ महाविद्यालय आणि प्राथमिक शाळेतील शिक्षक व कर्मचार्यांना मात्र ही सवलत उपलब्ध नव्हती. तत्कालिन शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी शिक्षक भारती व विना अनुदान विरोधी कृती समितीच्या पदाधिकार्यांसोबत नोव्हेंबर २००६ मध्ये झालेल्या बैठकीत विनाअनुदानित माध्यमिक शाळांना अनुदानावर आल्यावर वेतननिश्चितीसाठी सेवासातत्य देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ज्युनिअर कॉलेज व प्राथमिक शाळा शिक्षकांना हा निर्णय लागू करण्यास अधिकारी नकार देत होते, अशी माहिती शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष एम. एन. चलाख यांनी दिली. शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या सोबत २८ फेब्रुवारी २०१४ रोजी झालेल्या बैठकीत शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे आणि शिक्षण हक्क कृती समितीचे अध्यक्ष प. म. राऊत, अमोल ढोमढेरे, गिरीब सामंत, मुख्याध्यापक संघटनेचे प्रशांत रेडीज, आ. कपील पाटील यांनी लक्ष वेधले होते. शिक्षक व कर्मचार्यांना आता अनुदानित सेवेचा फायदा सातत्य वेतन निश्चिती, पदोन्नती आणि पेंशनसाठी होणार आहे. यामुळे राज्यातील ७३ हजार शिक्षक व कर्मचार्यांना लाभ मिळणार आहे, अशी माहिती एम. एन. चलाख, ज्ञानेश्वर रामटेके यांनी दिली आहे.