दुर्गम भागात ५४३ जात प्रमाणपत्रांचा दिला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:42 IST2021-02-20T05:42:44+5:302021-02-20T05:42:44+5:30
सिरोंचा : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी किष्टयापल्ली येथे उपविभागीय अधिकारी ...

दुर्गम भागात ५४३ जात प्रमाणपत्रांचा दिला लाभ
सिरोंचा : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी किष्टयापल्ली येथे उपविभागीय अधिकारी (महसूल) राहुल गुप्ता व तहसीलदार एच.एस. सय्यद यांच्या मार्गदर्शनात महाराजसस्व अभियानांतर्गत बुधवारी समाधान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ५४३ जातप्रमाणपत्र तसेच १६० शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.
सिराेंचा तालुक्यातील अनेक गावे आदिवासीबहुल व अतिदृर्गम आहेत. या गावातील नागरिकांना वारंवार तालुका स्थळी येणे, कागदपत्रे जमविणे आदी कामांसाठी त्रास सहन करावा लागत हाेता. त्यामुळे अनेकांकडे कागदपत्रे नव्हती. परिणामी नागरिक शासकीय याेजनांच्या लाभापासून वंचित राहत हाेते. ही बाब ओळखून तसेच नागरिक कागदपत्रांअभावी नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहू नये म्हणून तालुका प्रशासनाचे मंडळ अधिकारी, तलाठी, काेतवाल यांच्या माध्यमातून नागरिकांची कागदपत्रे गाेळा केली. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर शिबिराच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र व शिधापत्रिका वितरीत करण्यात आल्या. यावेळी रमेशगुडमच्या नवनिर्वाचित सरपंच कौशल्या आत्राम, काेर्लामालच्या सरपंच सुशिला वेलादी, मंडल अधिकारी एम.आर. बांडे, तलाठी एस.डी. तेलामी, राहुल पोरतेट, शिक्षक निमया आत्राम, नीलेश वेलादी, कोतवाल विजय सडमेक, जोगा मडे , श्रीनीवास सडमेक यांच्यासह गावकरी उपस्थित हाेते. दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत अद्यापही शासकीय याेजना पाेहाेचल्या नाही. त्यामुळे नागरिकांनी कागदपत्र तयार करुन याेजनांचा लाभ घ्यावा. तसेच याेजनांच्या माध्यमातून आर्थिक विकास साधावा, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. यशस्वीतेसाठी परिसरातील तलाठी, काेतवाल व पाेलीस पाटलांनी सहकार्य केले.
येथील लाेकांना मिळाला लाभ
सिराेंचा तालुक्यातील करजेली येथील नागरिकांना १०१ जातप्रमाणपत्र, व ६५ रेशन कार्ड, किष्टयापल्ली येथे ९१ जातप्रमाणपत्र व ८ रेशन कार्ड, कोर्लामाल येथे ३५१ जातप्रमाणपत्र व ८७ रेशन कार्ड असे एकूण ५४३ जातप्रमाणपत्र व १६० रेशन कार्ड उपविभागीय अधिकारी राहुल गुप्ता व तहसीलदार एच.एस.सय्यद यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील नागरिकांना जातप्रमाणपत्रांचा व शिधात्रिकांचा लाभ देण्यात आला. त्यामुळे नागरिकांना विविध याेजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांचा उपयाेग हाेणार आहे.