शेतकरी बचत गटांसाठी फायदेशीर योजना : ट्रॅक्टर खरेदीसाठी ३.१५ लाखांचे अनुदान मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 17:17 IST2025-05-02T17:15:49+5:302025-05-02T17:17:35+5:30
अनुसूचित जातींसाठी सुवर्णसंधी : स्वयंसहायता गटांसाठी फायदेशीर योजना

Beneficial scheme for farmer self-help groups : subsidy of Rs 3.15 lakhs will be available for purchase of tractor
गडचिरोली : सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी अनुदानावर मिनी ट्रॅक्टर दिला जातो. त्यासाठी २० टक्के अनुदान दिले जाते. जिल्ह्यात दरवर्षी अनुदानावर मिनी ट्रॅक्टरचे वितरण केले जात आहे.
७२ ट्रॅक्टर अनुदान वाटप गतवर्षभरात
जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटांना एकूण ७२ मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान वाटप करण्यात आले.
कागदपत्रे काय लागतात ?
- बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असल्याबाबत पासबुकची छायांकित प्रत. बचत गटांची बँकेने प्रमाणित केलेली सदस्यांची फोटोसह यादी. बचत गटातील अध्यक्ष, सचिवांसह किमान ८० टक्के सदस्यांचे जातीचे दाखले.
- सदस्यांचे रहिवासी दाखले/स्वयंघोषणापत्र. सदस्याचे आधारकार्ड, रेशनकार्ड, बचत गट स्थापनेचा ठराव, तसेच मिनी ट्रॅक्टर मिळविण्यासाठी सर्व सदस्यांचा ठराव. सदस्यांचा बैठकीचा एकत्रित छायाचित्र.
काय आहे योजना ?
स्वयंसहायता बचत गटांना ट्रॅक्टर खरेदीसाठी ३ लाख १५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. स्वयंसहायता गटात किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असणे आवश्यक आहे.
"स्वयंसहायता समूहातील सदस्यांना मिनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती कसता येते. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. समूहांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा."
- डॉ. सचिन मडावी, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग.