196 शाळांमध्ये वाजली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 05:00 IST2021-07-16T05:00:00+5:302021-07-16T05:00:37+5:30

ज्या गावात काेराेनाचा प्रादुर्भाव संपलेला आहे अशा गावांमधील शाळा ग्रामपंचायत आणि शाळा समितीच्या ठरावानंतर सुरू करण्यास मंजुरी दिली जात आहे. त्यानुसार गुरुवारी प्रत्यक्ष शाळांचे वर्ग भरविण्याचा पहिला दिवस होता. यात आठवी ते बारावीचेच वर्ग प्रत्यक्ष भरविण्यास शासनाने सांगितले जाते. २८ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले; पण प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास परवानगी नसल्यामुळे शक्य असलेल्या अनेक शाळांमध्ये ऑनलाईन वर्ग सुरू होते.

The bell rang in 196 schools | 196 शाळांमध्ये वाजली घंटा

196 शाळांमध्ये वाजली घंटा

ठळक मुद्दे२७ हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती; टप्प्या-टप्प्याने वाढेल शाळांची संख्या

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन पंधरवडा लोटल्यानंतर गुरुवारी (दि. १५) जिल्ह्यातील २५९ पैकी १९६ शाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग भरले. या वर्गांमध्ये पहिल्या दिवशी जवळपास २७ हजार विद्यार्थी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे शाळा प्रवेशोत्सव टाळून साध्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करून वर्ग सुरू करण्यात आले. तूर्त विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी येत्या काही दिवसांत विद्यार्थी आणि प्रत्यक्ष वर्ग भरणाऱ्या शाळांचीही संख्या वाढेल, असा विश्वास शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
ज्या गावात काेराेनाचा प्रादुर्भाव संपलेला आहे अशा गावांमधील शाळा ग्रामपंचायत आणि शाळा समितीच्या ठरावानंतर सुरू करण्यास मंजुरी दिली जात आहे. त्यानुसार गुरुवारी प्रत्यक्ष शाळांचे वर्ग भरविण्याचा पहिला दिवस होता. यात आठवी ते बारावीचेच वर्ग प्रत्यक्ष भरविण्यास शासनाने सांगितले जाते. २८ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले; पण प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास परवानगी नसल्यामुळे शक्य असलेल्या अनेक शाळांमध्ये ऑनलाईन वर्ग सुरू होते. जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाईन क्लासेस यशस्वी होऊ शकले नाही. 

राणी दुर्गावती विद्यालयात नवागतांचे स्वागत

- आलापल्ली येथील राणी दुर्गावती विद्यालयात नवीन शैक्षणिक सत्रात गुरूवारी आठवी ते दहावीचे वर्ग भरविण्यास सुरूवात झाली. पहिल्या दिवशी छोटेखानी समारंभाने नवागतांचे स्वागत केले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन लोनबळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच विनोद आकनपल्लीवार तसेच ग्रा.पं.सदस्य स्वप्नील श्रीरामवार, सोमेश्वर रामटेके, मनोज बोल्लूवार उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सरवर शेख, उषा गजभिये, पिंकी हलधर, तसेच साई पदमगिरीवार यांचीही उपस्थिती होती.
- अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्याना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक गजानन लोनबळे यांनी कोविडपासून वाचायचे असेल तर स्वतःवर काही बंधने घालून घेतली पाहिजेत असे सांगून काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले. संचालन गणेश पहापळे यांनी तर आभार श्रीनिवास कारेंगुलवार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर गोबाडे,जाहीद खान, प्रदीप दुधबावरे, ख्याती कश्यप, हेमलता धाबेकर, सत्येंदर सिलमवार, आरती गेडाम, सोहेल शेख, रुपेश जाकेवार, भीमराव निमसरकार, सचिन मेश्राम, शंकर चालूरकर, शांत मांडोरे यांनी सहकार्य केले.

चामोर्शी तालुक्यात २५ शाळा सुरू
चामोर्शी : ग्रामपंचायतचे ठरावानुसार ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावातील इयत्ता ८ ते १२ वी चे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्याचे निर्देश होते, परंतु ग्रामपंचायतच्या ठरवाअभावी तालुक्यातील केवळ २५ शाळा सुरू होऊ शकल्या. पहिल्या दिवशी अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कोरोनाच्या धास्तीने विद्यार्थ्यांची शाळेत कमी उपस्थिती होती. तालुक्यातील इयता ८ ते १२ वीच्या ६९ शाळांपैकी आज सुरू झालेल्या शाळांत खाजगी २२ आणि जिल्हा परिषदेच्या ३ अशा एकूण २५ शाळा सुरू झाल्या असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शहरी भागातील शाळा सुरू करण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर शहरातील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

कोत्तागुडम येथे गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट
सिरोंचा येथील भगवंतराव हायस्कूल कोत्तागुडम या शाळेत सिरोंचा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डी.वाय. कांबळे यांनी भेट देऊन मुख्याध्यापक के.बी. जवाजी आणि शिक्षकांना विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. शाळा निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थ्यांची नियमित तपासणी करणे, सेतू अभ्यासक्रम राबविणे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी नोंदी ठेवणे, तसेच बाहेरगावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे याबाबत त्यांनी सूचना दिल्या. शाळेतील कर्मचाऱ्यांची विचारपूस करून वर्ग खोली व हजेरी रजिस्टरची तपासणी केली. यावेळी सिरोंचा गट साधन केंद्राचे विषयतज्ज्ञ प्रदीप गायकवाड, सहाय्यक शिक्षक महेश वरखे, विवेक बेझलवार, शिक्षकेतर कर्मचारी श्रीनिवास पेंड्याला उपस्थित होते.

ठरावाअभावी आष्टीतील शाळा बंदच
आष्टी : आष्टी हे कोरोनामुक्त नसल्याने ग्राम पंचायतीने शाळा सुरू करण्यासंबंधीचा ठराव दिलेला नाही. त्यामुळे आष्टी गावातील पाच पैकी कोणत्याही शाळा गुरूवारी सुरू होऊ शकल्या नाही. पालकांना शाळा कधी सुरु होते याची प्रतीक्षा लागलेली आहे. मागील वर्षीपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी अभ्यासापासून दुरावला जात आहे. त्यामुळे त्यांच्या भविष्याची चिंता आता पालकांना लागलेली आहे. बऱ्याच पालकांनी व विद्यार्थ्यांनी शाळा सुरू होण्याबाबत शिक्षकांना फोनवरून विचारणा केली. आष्टी परिसरातील ठाकरी आणि अनखोडा या दोन गावातील शाळा गुरूवारपासून सुरू झाल्या आहेत. केंद्रप्रमुख झाडे यांनी या शाळांना भेट देऊन पाहणी केली.

 

Web Title: The bell rang in 196 schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.