अस्वलाचा इसमावर, तर रानडुकराचा महिलेवर हल्ल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:39 IST2021-05-11T04:39:31+5:302021-05-11T04:39:31+5:30
वैरागड : तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एका इसमावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले, तर दुसऱ्या एका घटनेत रानडुकराने ...

अस्वलाचा इसमावर, तर रानडुकराचा महिलेवर हल्ल्ला
वैरागड : तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एका इसमावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले, तर दुसऱ्या एका घटनेत रानडुकराने महिलेवर हल्ला करून जखमी केले. या दोन्ही घटना रविवारी वैरागडच्या जंगलात घडल्या.
वैरागड येथील श्रीराम भोंडे (५५) हे जंगलाला लागून असलेल्या नारायण नेवारे यांच्या शेताजवळ तेंदूपाने तोडत असताना अचानक अस्वलाने हल्ला केला. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. आरडाओरड केल्यानंतर अस्वल पळून गेले. लोकांनी त्यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. पण गंभीर जखमी भोंडे यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
दुसऱ्या एका घटनेत जंगलात तेंदूपाने संकलनासाठी गेलेल्या वनिता बनकर (४५) यांच्यावर रानडुकराने हल्ला करून जखमी केले. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून घरी पाठविण्यात आले.
या दोन्ही घटनांचा पंचनामा क्षेत्र सहायक एस.जी. सोनुले, वनरक्षक विकास शिवणकर यांनी करून वरिष्ठांकडे पाठविला आहे. तेंदूपत्ता संकलनाकरिता जाणाऱ्या लोकांनी एकट्याने जंगलात जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.