डेसीबल मर्यादेची ऐशीतैशी : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही पोलीस प्रशासन सुस्तगडचिरोली : सण व उत्सवाच्या काळात उत्साहाला उधाण येऊन जाते. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उत्सव साजरे करण्याची परंपरा विसरण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात रूढ होऊ लागला आहे. उत्सवाच्या नावाखाली नंगानाच समाजात सुरू झाला आहे. सार्वजनिक उत्सवाचे आयोजन करून लाखो रूपयाच्या वर्गणी गोळा करण्याचे काम करणारे सार्वजनिक मंडळ हे या बाबीसाठी जबाबदार आहेत. सामाजिक बांधिलकीचे भान नसणारे लोक असे प्रकार करीत असतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला उत्सवाच्या काळात वाजविले जाणारे वाद्य किती मर्यादेपर्यंत वाजविले जावे, याचे दिशानिर्देश देण्याची वेळ आली आहे. याला गडचिरोली शहरही अपवाद राहिलेले नाही. गडचिरोली शहरात विविध भागात मोठ्या प्रमाणावर गोपाल कृष्णापासून ते गणपती, दुर्गा, शारदा आदी सर्व उत्सव साजरे केले जातात. उत्सव साजरा करण्याला कुणाचीही मनाई नाही. परंतु हे सर्व साजरे करतांना सामाजिक भान लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक उत्सवाचा कालावधी निश्चित आहे. परंतु १० दिवसाचा गणपती १५ व २० दिवसही विसर्जीत केला जात नाही. गणपतीच्या मंडपातच गणराजाच्या साक्षीने सार्वजनिक वर्गणीतून सकाळ आणि संध्याकाळी शेकडो गणेशभक्त जुगार खेळतात. गणपती विसर्जनासाठी किमान एक ते दीड लाखाचा डीजे आणला जातो व दिवसभर व रात्री १० नंतरही तो बदडला जातो. त्या तालावर मद्याच्या धुंदीत बेभान होऊन भारताचा आधार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, ती तरूणाई नाचते. त्यावेळी रस्त्यावरून वाहतूक आपल्यामुळे अडली आहे, याचे भानही त्यांना राहत नाही. रस्त्यावरून आई, बहिणी दुचाकीने जातात. त्यांना रस्ता मोकळा करून दिला पाहिजे, याचाही विसर या मंडळींना पडतो. ज्या मिरवणुकांसाठी पोलिसांची परवानगी घेतली जाते. म्हणून मिरवणुकासोबत एक ते दोन पोलीस व तेवढेच गृहरक्षक दलाचे जवान असतात. त्यांच्या साक्षीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या डेसीबल मर्यादेपेक्षाही अधिक आवाजात वाद्य वाजविले जातात. प्रत्येक चौकात किमान अर्धा तास हा गोंगाट सुरू असतो. यांना कुणीतरी आवरण्याची गरज आहे. उत्सवातील सामाजिक भान आम्ही के व्हाच विरून गेलो आहो. आता उत्सव केवळ मौजमजेसाठी साजरे केले जात आहे.परप्रांतातून डीजे आणून तो बदडला जात आहे. पोलीस प्रशासनही या बाबीला तेवढेच जबाबदार आहे. येत्या चार दिवसानंतर गणरायाचे आगमन होणार आहे. येथून किमान दिवाळीपर्यंत हे उत्सव साजरे केले जाणार आहे. त्यामुळे आवाजाच्या मर्यादेबाबत सर्वांनाच कडक सूचना देण्याची गरज आहे. मुळातच डीजे वाजविण्याला परवानगीच देऊ नये, महाराष्ट्रातील अनेक शहरांनी यंदा डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा वसा उचलला आहे. गडचिरोलीकरांनीही असा नवा पायंडा पाडून आपल्या मंडळाच्या पैशाची बचतही करावी. याऐवजी साध्या बॅडच्याही गजरात गणरायाचे आगमन व विसर्जन करता येऊ शकते, याचे भान ठेवावे. पोलीस प्रशासन केवळ मंडळांना परवानगी देऊन मोकळे होऊन जाते. ते किती आवाजात वाद्य वाजवित आहेत, हे पाहण्याची फुरसदही पोलीस प्रशासनाला नाही. जोपर्यंत पोलीस याबाबतीत पुढाकार घेणार नाही, तोपर्यंत कुणालाही कायदा समजत नाही. डीजे भाड्याने देणाऱ्यांवर व वाद्य जोराने वाजविणाऱ्यांवर कारवाई झाल्यास सर्व सुधारणा होते, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे आता हा प्रकार आवरण्यासाठी कडक अंमलबजावणीची आवश्यकता आहे. अन्यथा सर्वसामान्य माणसाचा उद्रेक या ध्वनीप्रदुषणाच्या विरोधात झाल्याशिवाय राहणार नाही, याची जाणीव सर्वांनिच ठेवायला हवी. उत्सवातील बिभत्सरपणा वाढीस लागत आहे, असे खेदाने म्हणावे लागते. (जिल्हा प्रतिनिधी)
यांना आवरा हो...
By admin | Updated: August 24, 2014 23:30 IST