दोन राज्यांतील नागरिकांची मने जोडतो बतकम्मा उत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 15:22 IST2024-10-08T15:21:25+5:302024-10-08T15:22:06+5:30
Gadchiroli : आकर्षक फुलांनी तयार केली जाते देवी, उत्सवाला सुरुवात

Batakamma festival connects the hearts of citizens of two states
कौसर खान
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : महाराष्ट्राच्या टोकाला असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात तेलुगू भाषिक नागरिकांची संख्या मोठी आहे. येथील धार्मिक परंपरा दाक्षिणात्य परंपरेशी जोडलेली आहे. दरवर्षी साजरा होणारा बतकम्मा महोत्सव संपूर्ण जिल्ह्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
सिरोंचा तहसील तेलंगणा राज्याला लागून असल्याने येथील नागरिकांची परंपरा आणि सण साजरे करण्याची पद्धत पूर्णपणे दक्षिणेकडील आहे. दिवाळी आणि दसन्याप्रमाणेच येथील महिला बतकम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात, दरवर्षी दसऱ्याच्या एक दिवस आधी म्हणजे नवमीला बतकम्मा उत्सव आयोजित केला जातो. बतकम्मा हे गौरीचे रूप मानले जाते. भाविकांच्या मते हा सण प्रामुख्याने महिलांच्या श्रद्धेशी संबंधित आहे. या दिवशी महिला विविध प्रकारची फुले गोळा करून भांड्यात फुलांपासून बतकम्मा देवीची प्रतिकृती तयार करतात. ही प्रतिकृती जितकी मोठी तितकी तिची जागा मोठी असते.
बतकम्मा तयार केलेल्या प्रतिकृतीची मंदिरात नेऊन पूजा केली जाते. विविध प्रकारची भजनेही गायली जातात. या काळात मुलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. नऊ दिवस भाविकांची रेलचेल असते.
अशी आहे बतकम्मा सणाची आख्यायिका
हजारो वर्षांपूर्वी उत्तर तेलंगणातील एका जिल्ह्यातील घनदाट जंगलात काही राक्षसांनी कहर केला होता. परिसरात राहणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेशी ते खेळू लागले. काही स्त्रियांनी राक्षसांविरोधात आवाज उठवला आणि महान ऋषींना त्यांची दुर्दशा सांगितली. राक्षसांपासून सुरक्षित राहण्यासाठी ऋषींनी स्त्रियांना गौरी देवीची पूजा करण्याचा सल्ला दिला. मग त्या प्रांतातील स्त्रिया काही फुले गोळा करून पूजा करू लागल्या. यावेळी गौरी माता प्रसन्न झाली आणि त्यांनी महिलांना दर्शन दिले. राक्षसांना मारण्याचे वचन देऊन माता गौरीने राक्षसांना भूतबाधा केली. यानंतर महिलांनी आपल्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी माता गौरीची पूजा करण्यास सुरुवात केली.
अनेक वर्षांची उत्सवाची परंपरा
तेलुगू भाषेत गौरी देवीला बतकम्मा माता म्हणून ओळखले जाते. सिरोंचा तहसील पूर्णपणे तेलंगणा राज्याला लागून असल्याने येथील महिला गेल्या अनेक वर्षांपासून हा सण साजरा करत आहेत. या सणाला उपस्थित राहणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे