१५६ गावांमध्ये होणार बेसिक बँक
By Admin | Updated: January 24, 2017 01:54 IST2017-01-24T01:54:45+5:302017-01-24T01:54:45+5:30
ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला बँकेची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती

१५६ गावांमध्ये होणार बेसिक बँक
अध्यक्षांची माहिती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रम
गडचिरोली : ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला बँकेची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विशेष उपक्रम हाती घेतला असून सुमारे १५६ गावांमध्ये बेसिक बँक स्थापन केली जाणार आहे. बँकेचा प्रतिनिधी संबंधित गावात जाऊन पैसे डिपॉझीट करणे, दुसऱ्या खात्यावर पाठविणे, रक्कम काढणे, शिल्लक रक्कमेची तपासणी करणे, मिनी स्टेटमेंट काढणे यासारखी कामे करणार आहे. त्यामुळे गाव तिथे बँक हे केंद्र सरकारचे स्वप्न गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पूर्ण करेल, असा विश्वास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी व्यक्त केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे उत्पन्न इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण १२० शाखा आहेत. म्हणजेच जवळपास ५०० गावांनाच बँकेचा लाभ मिळतो. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १६०० गावांपैकी सुमारे ११०० गावे आजही बँक सुविधेपासून वंचित आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत बँकेची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केला आहे. या अंतर्गत एकूण १५६ गावांमध्ये बेसीक बँक स्थापन केली जाणार आहे. ३१ मार्च पूर्वी किमान ५० गावांमध्ये बेसीक बँक स्थापन करण्याचे डीसीसी बँकेचे लक्ष्य आहे, अशी माहिती प्रंचित पोरेड्डीवार यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेला ३१ वर्ष पूर्ण झाली आहेत. सोमवारी बँकेच्या सभागृहात कॅशलेस प्रणालीचा शुभारंभ बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आला. बँकेच्या एकूण ५५ शाखा आहेत. ४ लाख २६ हजार खातेदार बँकेशी जोडले आहेत. नाबॉर्डने बँकेला अ वर्ग दर्जा दिला आहे. ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत बँकेकडे १ हजार १४२ कोटींच्या ठेवी, ६८४ कोटींची कर्ज बाकी आहे. एकूण व्यवसाय १ हजार ७८४ कोटी रूपये आहे. ३१ मार्च २०१६ ला बँकेचा नफा ९.५५ कोटी रूपये होता. नेट एनपीए शुन्य आहे. तर सीआरएआर २५.५१ टक्के एवढा आहे. मध्यवर्ती बँक युपीआय अॅप तयार करणार असून त्यामुळे मोबाईल बँकींग ग्राहकांना देणार आहे. पीओएस खरेदीची सुविधा देणार आहे. मार्च २०१७ पर्यंत बँकेचे सभासद व शेतकरी सभासदांना एक लाख रूपे एटीएम डेबीट कार्डचे वितरण केले जाईल. ग्राहकांना एसएमएस सुविधा, आरटीजीएस, एनव्हीएफटी, पासबूक प्रिंटींग मशीन, आधारलेस पेमेंट प्रणाली आदी सुविधा दिल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी दिली.
पत्रकार परिषदेला बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, व्यवस्थापक अरूण निंबेकर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
२१० गावांमध्ये कॅशलेसबाबत मार्गदर्शन
४केंद्र सरकारने नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले. कॅशलेस व्यवहारांची माहिती नागरिकांना कळावी, त्याचे फायदे लक्षात यावे, यासाठी बँकेने नाबार्डच्या सहकाऱ्याने २१० गावांमध्ये डिजीटल आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रम घेतले. या कार्यक्रमाचा लाभ २३ हजार नागरिकांनी घेतला आहे.
४जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०१५-१६ चा राज्यस्तरीय ‘कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचे वितरण १० फेब्रुवारी २०१७ रोजी मुंबई येथे होणार आहे. सदर पुरस्कार राज्यस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आहे.