Awareness rally of the Matrvandana Yojana | मातृवंदना योजनेची जनजागृती रॅली
मातृवंदना योजनेची जनजागृती रॅली

ठळक मुद्देमहिला बाल रूग्णालयातून सुरूवात : २ ते ८ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गरोदर माता व नवजात बालकाचे संगोपण व्हावे, यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. या योजनेची जनजागृती करण्यासाठी महिला व बाल रूग्णालयातून २ डिसेंबर रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली. २ ते ८ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रम राबवून जनजागृती केली जाणार आहे.
महिला रूग्णालयात आयोजित कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, महिला व बाल रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी डॉ.सुनील मडावी, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बागराज धुर्वे, डॉ. राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अनुपम महेशगौरी आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी मार्गदर्शन करताना ज्या मातांची प्रसुती होऊन सुध्दा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा मातांना प्रसुतीनंतर ४६० दिवसापर्यंत लाभ देता येतो, असे मार्गदर्शन केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. ही योजना तळागाळातील सर्व मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे, असे मार्गदर्शन केले. आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेणार आहेत, असे सांगितले. प्रास्ताविकादरम्यान डॉ. सुनील मडावी यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजना गडचिरोलीसारख्या मागासवर्गीय जिल्ह्यातील मातांसाठी वरदान ठरणारी आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ‘सुरक्षित जननी विकसीत धारणी’ अशा घोषणा देत महिला व बाल रूग्णालयातून रॅली काढण्यात आली. प्रास्ताविक डॉ. सुनील मडावी, संचालन रचना फुलझले, तर आभार आरोग्य सहायक आनंद मोडक यांनी मानले.

पाच हजार रुपयांचा मिळतो लाभ
गरोदरपणात व प्रसुतीनंतर योग्य औषधोपचार, पोषण आहार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने केंद्र शासनाने १ सप्टेंबर २०१७ रोजी ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शासकीय आरोग्य संस्थेतील एएनएमकडे मासिक पाळी सुटल्यानंतर १०० दिवसांच्या आत नोंदणी केल्यानंतर हजार रुपये अनुदान बँक खात्यात टाकले जाते. गरोदरपणाच्या सहा महिन्यात किमान एक प्रसुतीपूर्वी तपासणी केली असल्यास दोन हजार रुपयांचा लाभ दिला जातो. प्रसुतीनंतर प्रसुतीनंतर बाळाची नोंद व बाळाची १४ आठवड्यापर्यंतचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन हजार रुपये अनुदान असे एकूण पाच हजार रुपये अनुदान दिले जाते. विशेष म्हणजे, पहिल्या प्रसुतीवेळी अनुदान मिळते.

Web Title: Awareness rally of the Matrvandana Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.