‘ई-पास’साठी दरदिवशी सरासरी १५० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST2021-05-05T05:00:24+5:302021-05-05T05:00:24+5:30

जिल्हाबंदी केल्यास नागरिकांच्या अनावश्यक प्रवासावर बरीच बंधने येऊ शकत असल्याने संचारबंदीचे नियम कडक करताना शासनाने जिल्हाबंदीचा निर्णय घेतला आहे. ...

An average of 150 applications per day for e-pass | ‘ई-पास’साठी दरदिवशी सरासरी १५० अर्ज

‘ई-पास’साठी दरदिवशी सरासरी १५० अर्ज

जिल्हाबंदी केल्यास नागरिकांच्या अनावश्यक प्रवासावर बरीच बंधने येऊ शकत असल्याने संचारबंदीचे नियम कडक करताना शासनाने जिल्हाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या प्रमुख मार्गांवर पाेलीस विभागाने चाैक्या बसविल्या आहेत. पाेलीस विभागाकडून काढलेले ई-पास असल्याशिवाय आपल्या जिल्ह्यातील व्यक्तीला दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ देऊ नये व दुसऱ्या जिल्ह्यातील व्यक्तीला आपल्या जिल्ह्यात प्रवेश दिला जाऊ नये, असे शासनाचे निर्देश आहेत. काेराेनाचा प्रसार वाढला असल्याने नागरिक दुसऱ्या जिल्ह्यात सहजासहजी जात नाही. वैद्यकीय कारण असेल तर मात्र दुसऱ्या गावी जावे लागते. अशावेळी पाेलीस विभागाकडून ई-पासच्या माध्यमातून परवानगी मागावी लागते. पाेलीस विभागाकडे दरदिवशी जवळपास १५० अर्ज प्राप्त हाेतात. त्यापैकी सरासरी केवळ ४० ते ५० अर्जच शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वैद्य ठरत असल्याने त्यांना परवानगी दिली जात आहे. २२ एप्रिल ते ४ मे या कालावधीत जवळपास १ हजार ८०० अर्ज प्राप्त झाले आहेत.

बाॅक्स

ई-पाससाठी असा करावा अर्ज

ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येते. या ठिकाणी विचारलेले आवश्यक कारण, कागदपत्रे नमूद करावीत. त्यानंतर फाेटाे अपलाेड करून अर्ज सबमिट करावा. अर्ज सादर केल्यानंतर एक टाेकन आयडी मिळेल. हा आयडी सेव्ह करून ठेवावा. या आयडीवरूनच ई-पास डाऊनलाेड करता येईल.

बाॅक्स

शेतीच्या कारणावरून सर्वाधिक अर्ज

मागील वर्षी शेतीचा हंगाम सुरू झाल्याने दुसऱ्या जिल्ह्यात शेती असल्यास संबंधित शेतकऱ्याला जाण्याची परवानगी दिली जात हाेती. यावर्षी शेतीचा हंगाम अजून सुरू झालेला नाही. मात्र, शेतीची कारणे सांगून अनेक अर्ज प्राप्त हाेत आहेत. शेतीच्या कारणावरून ई-पास देण्याचे अजूनपर्यंत शासनाकडून निर्देश प्राप्त झाले नसल्याने पाेलीस विभाग असे अर्ज नामंजूर करीत आहेत. वैद्यकीय कारण, आजारी नातेवाइकांना भेटणे, अंत्यविधी आदी कारणांसाठी पास दिले जात आहेत.

बाॅक्स

पाससाठी ही कागदपत्रे हवीत

ई-पास काढण्यासाठी सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून काेविड-१९ चे काेणतेही लक्षण नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र असावे. ज्या वाहनाने प्रवास करणार आहात त्या वाहनाचा नंबर, एक पासपाेर्ट साईज फाेटाे आवश्यक आहे.

बाॅक्स

चाेवीस तासांत मिळतो पास

ई-पास देण्यासाठी पाेलीस विभागाच्या डीएसबी शाखेत तीन पाेलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राप्त अर्जांची या विभागाकडून शहानिशा केली जाते. त्यानंतर पास दिले जातात. ही सर्व प्रक्रिया चाेवीस तासांच्या आत पूर्ण करून पास दिला जातो किंवा अर्ज रिजेक्ट केला जातो.

आतापर्यंत प्राप्त अर्ज - १८००

आतापर्यंत दिलेले पास - ६००

Web Title: An average of 150 applications per day for e-pass