अपहरणाचा प्रयत्न; दोन अल्पवयीन आरोपींना अटक, सात फरार; मुडझा येथील घटना
By दिलीप दहेलकर | Updated: June 16, 2023 21:05 IST2023-06-16T21:04:39+5:302023-06-16T21:05:02+5:30
अल्पवयीन आरोपींची ग्रामस्थांकडून धरपकड

अपहरणाचा प्रयत्न; दोन अल्पवयीन आरोपींना अटक, सात फरार; मुडझा येथील घटना
गडचिरोली -जुन्या क्षूल्लक वादातून गुरुवारी रात्रीच्या सुमारास काही युवकांनी शहरापासून जवळच असलेल्या मुडझा येथील एका युवकाचा अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी दोन अल्पवयीन बालकांना अटक केली आहे. तर याप्रकरणी आणखी सात आरोपी फरार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी फरार आरोपींमध्ये राजेंद्र ऊर्फ गोलू संपन मंडल रा. कुनघाडा ता. चामोर्शी, नकुल भोयर रा. चामोर्शी, मुस्तफा पठाण रा. कुनघाडा या चार आरोपींचा समावेश आहे. उर्वरीत आरोपींची उशिरापर्यत नावे कळू शकली नाहीत.
सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली शहरापासून जवळच असलेल्या मुडझा येथील समीर चौधरी या युवकासोबत कुनघाडा येथील अल्पवयीन मुलाचा जुना वाद होता. या कारणातूनच गुरुवारी रात्रीच्या सुमारास मोबाईलवरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. या विवादातून अल्पवयीन आरोपीने समीरचे अपहरण करण्याची धमकी दिली. दरम्यान गुरुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास 9 आरोपी वाहनात बसून मुडझा येथे पोहचले. गावात पोहचून त्यांनी समीरचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला. वाहनातून बराच वेळ त्याला फिरविल्यानंतर आरोपींना त्याला परत गावात आणून सोडले. दरम्यान गावातील नागरिकांना याची माहिती होताच यातील दोन अल्पवयीन आरोपींना पकडून घेतले. तर उर्वरीत आरोपी वाहनातून पळून जाण्यात यशस्वी झाले. गडचिरोली पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरीत आरोपींचा शोध सुरु आहे.
अल्पवयीन आरोपींची ग्रामस्थांकडून धरपकड
मुझडा येथील समीर चौधरी याचे अपहरण करण्यासाठी आलेल्या 9 आरोपींपैकी एका अल्पवयीन आरोपीस ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने पकडले. घटनेची माहिती तत्काळ गडचिरोली पोलिसांना देताच पोलिसांनी तत्परता दाखवित घटनास्थळ गाठले. घटनेची संपूर्ण माहिती घेत पोलिसांनी दुस-या अल्पवयीन बालकासही तत्काळ अटक केली. दोन्ही आरोपी बालकांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करीत त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक तोटेवार करीत आहेत.