एनसीडी कार्यक्रम गुंडाळण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: April 10, 2015 01:09 IST2015-04-10T01:09:26+5:302015-04-10T01:09:26+5:30
दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजाविणारा एनसीडी ...

एनसीडी कार्यक्रम गुंडाळण्याचा प्रयत्न
ए. आर. खान अहेरी
दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजाविणारा एनसीडी (राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम) बंद करण्याचा घाट शासनाने घातला असून त्याची प्रथम अंमलबजावणी म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली जात आहे.
बदललेल्या जीवनशैलीमुळे संसर्गजन्य रोगांबरोबरच असंसर्गजन्य रोगांनीही जवळपास ५० टक्के नागरिक पीडित आहेत. यातील बहुतांश नागरिक गरीब आहेत. मात्र या रोगांवर उपचाराचा खर्च जास्त आहे. परिणामी यावर उपचार करताना गरीब नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या नागरिकांना उपचार मिळावे, त्यांची तपासणी मोफत व्हावी या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१२ पासून देशपातळीवर असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत कंत्राटी पध्दतीवर प्रत्येक रूग्णालयात डॉक्टर, कॉन्सीलर, आरोग्य सेविका, डाटाएन्ट्री आॅपरेटर, लॅब टेक्नीशियन व थेरेपी या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागात आरोग्य शिबिर घेऊन हजारो नागरिकांची आरोग्य तपासणी केली व औषधोपचार केला. या कार्यक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. रोगनिदान उपचाराबरोबरच या रोगांबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचेही काम करण्यात आले. मात्र शासनाने या कार्यक्रमातील कॉन्सीलर, डाटाएन्ट्री आॅपरेटर, लॅब टेक्नीशियन ही पदे कमी करून केवळ डॉक्टर व आरोग्य सेविका हे दोनच पदे ठेवणार आहेत. राज्यभरातील सुमारे २३८ आरोग्य कर्मचारी कमी करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त यांनी दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने याचा विपरित परिणाम कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर होणार आहे.