अटलजींच्या जाहीर सभेने गाठला होता गर्दीचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:42 PM2018-08-16T23:42:45+5:302018-08-16T23:43:10+5:30

ओजस्वी वक्ते, संवेदशील कवी आणि अजातशत्रू नेता म्हणून देशावर आपली छाप पाडणारे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ भाजप नेते, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने गडचिरोलीवासीयांच्या ३३ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या.

Atlaji's public meeting reached a high peak | अटलजींच्या जाहीर सभेने गाठला होता गर्दीचा उच्चांक

अटलजींच्या जाहीर सभेने गाठला होता गर्दीचा उच्चांक

Next
ठळक मुद्देदोन वेळा गडचिरोलीत सभा : पक्षनिधी म्हणून कार्यकर्त्यांनी दिली होती ३० हजार रुपयांची थैली

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ओजस्वी वक्ते, संवेदशील कवी आणि अजातशत्रू नेता म्हणून देशावर आपली छाप पाडणारे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ भाजप नेते, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने गडचिरोलीवासीयांच्या ३३ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. राजकीय कारकिर्दीत दोन वेळा गडचिरोलीत जाहीर सभा घेणाऱ्या अटलजींची दुसरी सभा तर गडचिरोलीचा अनेक वर्षातील गर्दीचा उच्चांक गाठणारी ठरली. गुरूवारी सायंकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
अटलजींची गडचिरोलीतील पहिली सभा १९८५ च्या सुमारास झाली होती. त्यावेळी ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. इंदिरा गांधी चौकातील श्याम टॉकीजच्या बाजुला असलेल्या खुल्या जागेवर ती जाहीर सभा झाली होती. त्यावेळी पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांच्या वतीने जमा करण्यात आलेल्या ३० हजार रुपयांच्या निधीची थैली आणि तलवार त्यांना भेट देण्यात आली होती.
दुसरी जाहीर सभा १९९६ मध्ये झाली. ही सभा वसंत विद्यालयाच्या पाठीमागच्या मैदानावर झाली होती. त्यावेळी राज्यात जेमतेम भाजप-सेनेचे युती सरकार सत्तेवर आले होते. महाराष्ट्राप्रमाणे केंद्रातही भाजपचा झेंडा फडकवण्याचा संकल्प करीत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी झंझावती दौऱ्यावर निघाले होते. आज गडचिरोलीवासियांसाठी हेलिकॉप्टरचे दर्शन रोजचेच झाले असले तरी त्यावेळी अटलजींचे हेलिकॉप्टर शहरवासियांचे अप्रुप होते. राज्य मंत्रीमंडळातील तत्कालीन मंत्री नितीन गडकरी, शोभाताई फडणवीस यांच्यासह अ‍ॅड.दादाजी देशकर, लोकसभेचे उमेदवार विलास कोडाप, भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष हेमंत जंबेवार, बाबुराव कोहळे आदी मंचावर विराजमान होते.
विरोधी पक्षनेते म्हणून लोकसभेत आपली छाप पाडणाºया अटलजींना ऐकण्यासाठी त्यावेळी गडचिरोली शहरासह जिल्हाभरातून लोक जमले होते. समर्थ यांच्या घरापासून तर आताच्या महिला रुग्णालयापर्यंत लोक सभेत बसले होते. त्यावेळी त्या भागात आतासारखी दुकाने, वॉल कंपाऊंड काहीही नव्हते. त्यामुळे धानोरा मार्गापर्यंत सर्व भाग मोकळा होता. त्या सभेत जिल्हा भाजपच्या वतीने अटलजींना ५ लाख रुपयांची थैली पक्षकार्यासाठी भेट देण्यात आली होती. त्या निवडणुकीनंतरच अटलजी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यानंतरही त्यांनी गडचिरोलीशी ऋणानुबंध कायम ठेवले.
कवितेची दखल
१९९६ च्या लोकसभा निवडणुकीनंतर अटलजी पंतप्रधान झाले. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी त्यांनी श्रीनगर ते लाहोर ही बस सुरू केली होती. त्यावर आधारित ‘शांती का संदेश’ ही कविता भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष हेमंत जंबेवार यांचे वडील आणि व्यवसायाने शिक्षक तथा कवी असलेले मधुकर जंबेवार यांनी आपल्या ‘मधुरांगन’ या हिंदी कवितासंग्रहात प्रकाशित केली होती. त्याची प्रत अटलजींना पाठविल्यानंतर त्यांनी आपल्या खासगी सचिवामार्फत जंबेवार यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानून आपल्यातील सहृदयी व्यक्तिमत्त्वाचा परिचय दिला.
कार्यकर्त्यांची प्रार्थना
अटलजींची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुपारी गडचिरोली शहरालगतच्या सेमाना देवस्थान येथे प्रार्थना केली. यावेळी भारत खटी, दामोदर अरगेला, अनिल पोहनकर, प्रकाश अर्जुनवार, नंदू काबरा, अनिल कुनघाडकर, अविनाश महाजन, आनंद श्रृंगारपवार, विनोद देवोजवार, अंकित हेमके, डेडुजी राऊत आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Atlaji's public meeting reached a high peak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.