सहायक आरोग्य संचालक कोरचीत पोहोचले
By Admin | Updated: November 22, 2015 01:30 IST2015-11-22T01:30:09+5:302015-11-22T01:30:09+5:30
कोरची तालुक्यात मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. येथे रूग्णांची संख्या १६९ वर पोहोचली. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ...

सहायक आरोग्य संचालक कोरचीत पोहोचले
कर्मचाऱ्यांची घेतली बैठक : मलेरिया नियंत्रणात आणण्यासाठी सुचविल्या उपाययोजना
कोरची : कोरची तालुक्यात मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. येथे रूग्णांची संख्या १६९ वर पोहोचली. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी नागपूर विभागाचे सहायक आरोग्य संचालक डॉ. संजय जयस्वाल यांना कोरचीला जाण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी डॉ. जयस्वाल कोरची येथे पोहोचले व त्यांनी येथील मलेरिया रूग्णांच्या परिस्थितीची माहिती जाणून घेतली.
यावेळी त्यांच्या समावेत गडचिरोलीचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मलेरियाची साथ नियंत्रणात आणण्याबाबत करावयाच्या उपाययोजना सुचविल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन सर्वेक्षण करून रूग्णांना औषध पुरवठा करण्याबाबतही निर्देश दिले. गावागावात फवारणी कार्यक्रम हाती घेण्याबाबतही सहायक आरोग्य संचालकांनी सूचना केल्या.
कोरची तालुक्यातील मलेरियाची साथ आटोक्यात आणण्यासाठी सहायक आरोग्य संचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या निर्देशानुसार कोरचीच्या रूग्णालयात सहा अतिरिक्त डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या रूग्णालयात एकूण नऊ वैद्यकीय अधिकारी रूग्णांच्या सेवेत दाखल झाले आहेत. कोरचीच्या रूग्णालयात औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून मलेरियाची औषध पुरविण्यात आली आहे. गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयातून १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका कोरचीच्या रूग्णालयात देण्यात आली आहे. सहायक आरोग्य संचालकाच्या भेटीनंतर कोरचीच्या ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरची चमू व आरोग्य कर्मचारी मलेरियाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न ुसुरू केले आहेत. या रूग्णालयातील मलेरिया रूग्णांच्या स्थितीबाबात रोजचा आढावा घेण्याचे काम जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा हिवताप अधिकारी करीत आहेत. सर्व डॉक्टरांना मुख्यालयी राहून सेवा देण्याचे निर्देश सहायक आरोग्य संचालक डॉ. जयस्वाल यांनी भेटीदरम्यान दिले. (तालुका प्रतिनिधी)
रक्त नमुने घेण्यास भिडले आरोग्य कर्मचारी
कोरची तालुक्यात नऊ दिवसात १६९ मलेरियाचे रूग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. कोरची, मसेली आदीसह अनेक गावात मलेरियाचे रूग्ण आढळून आले असून यांच्यावर कोरची ग्रामीण रूग्णालय व मसेली आरोग्य पथकात उपचार सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने आदेश दिल्याप्रमाणे गावागावात रूग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून आरोग्य कर्मचारी आजारी लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवित आहेत. या कामाचाही नागपूर विभागाचे सहायक आरोग्य संचालक डॉ. संजय जयस्वाल व गडचिरोलीचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी शुक्रवारी आढावा घेतला व कर्मचाऱ्यांना याबाबत आवश्यक ते दिशानिर्देश दिले. स्थानिक रूग्णालयात व गावातही रक्त नमुने तपासण्याची व्यवस्था झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.