Assembly polls drop 'mini ministry' | विधानसभा निवडणुकीने ‘मिनी मंत्रालय’ पडले ओस

विधानसभा निवडणुकीने ‘मिनी मंत्रालय’ पडले ओस

ठळक मुद्देकार्यालयात शुकशुकाट : पदाधिकारी व सदस्य प्रचारात व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सर्वसामान्यांच्या कामाचे हक्काचे ठिकाण म्हणून ‘मिनी मंत्रालय’ म्हणजेच जिल्हा परिषदेला ओळखले जाते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हा परिषद कार्यालयाकडे पाठ फिरविली आहे. कारण हे सर्व सदस्य आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत. जिल्हा परिषदेचे बहुतेक कर्मचारी निवडणूक प्रक्रियेच्या कामात व्यस्त असल्याने दिवसभर जिल्हा परिषद कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा संबोधल्या जाते. याला मिनी मंत्रालय म्हणून ओळख आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अधिकाधिक जि.प.सदस्य भाजपचे त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांचे आहेत. पक्षाशी बांधिलकी व नेत्यांप्रती निष्ठा म्हणून जि.प.चे पदाधिकारी व सदस्य ग्रामीण भागात प्रचार करताना दिसून येत आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी विजयाच्या गणिताची गोळाबेरीज केली आहे. या निवडणुकीचा ज्वर आता जिल्हा परिषदेतही दिसू लागला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्हा परिषदेतील बहुतांश सभापतीचे कक्षांमध्ये शुकशुकाट होता. जि.प.चे पदाधिकारी व सदस्य आता गेल्या १५ दिवसांपासून जि.प. कार्यालयाकडे जात नसल्याचे दिसून येते.
एरवी पदाधिकारी नेहमी जि.प. कार्यालयात उपस्थित राहत होते. त्यांच्या कार्यकर्त्याचा लवाजमा दिसून येत होता. शासकीय कामे करणाºया नागरिक व कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत होती. मात्र आता निवडणुकीच्या कालावधीत जिल्हा परिषदमध्ये शुकशुकाट दिसून येतो. जि.प.च्या अनेक विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांकडे निवडणुकीबाबतचे कामकाज सोपविण्यात आले आहे. त्यामुळे हे कर्मचारी सुद्धा जि.प.कार्यालयात न राहता दुसºया कार्यालयात निवडणुक कामात व्यस्त आहेत. परिणामी जिल्हा परिषदेत शुकशुकाट दिसून येत आहे.

पंचायत समिती शांत
ग्रामपातळीवरील अनेक नागरीक तसेच ग्रा. प. सदस्य विविध कामासाठी पंचायत समिती कार्यालयात नेहमी येत असतात. मात्र आता निवडणुक असल्याने पं. स. कार्यालयाकडे कुणीही फिरकत नाही. शांतता आहे.

Web Title: Assembly polls drop 'mini ministry'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.