जिल्ह्यात पशुवैद्यकीय पदे रिक्त असल्याने एका डॉक्टरला सांभाळावा लागतो दोन ते तीन दवाखान्याचा भार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:12 IST2025-01-22T15:11:10+5:302025-01-22T15:12:41+5:30

Gadchiroli : १६ गावे दोन पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत येतात

As there are no veterinary posts vacant in the district, one doctor has to handle the burden of two to three clinics. | जिल्ह्यात पशुवैद्यकीय पदे रिक्त असल्याने एका डॉक्टरला सांभाळावा लागतो दोन ते तीन दवाखान्याचा भार

As there are no veterinary posts vacant in the district, one doctor has to handle the burden of two to three clinics.

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्यातील अनेक पदे रिक्त असल्याने एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दोन ते तीन दवाखान्यांचा कारभार सांभाळावा लागत आहे. असाच प्रकार गडचिरोली तालुक्यातील कुन्हाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दिसून येत आहे. येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कुन्हाडी व गुरखळा येथील दवाखान्याचा प्रभार देण्यात आल्याने त्यांना दोन्ही दवाखान्यांच्या हद्दीतील तब्बल १६ गावांमधील जनावरांवर उपचार करावे लागत आहेत.


शेतकऱ्यांच्या पशुधनावर योग्य उपचार व्हावेत, त्यांना वेळीच उपचार मिळावेत, यासाठी शासनाने गावोगावी पशुवैद्यकीय दवाखाने निर्माण केले. येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शेतकरी व पशुपालकांच्या पशुधनावर उपचार केले जातात. मात्र, जिल्ह्यातील अनेक गावांतील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, परिचर आदी पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाचा अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. गडचिरोली तालुक्यातील कुन्हाडी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुरवळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा प्रभार असल्याने पशुधनावर उपचार करताना त्यांची दमछाक होत आहे.


गुरवळा पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत गुरवळा, विहीरगाव, राखी, कुंभी, मसेली आदी ९ गावे येतात. तर कुन्हाडी पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत महादवाडी, कुन्हाडी गोगाव, अडपल्ली, चुरचुरा, चुरचुरा माल, दिभना ही ७ गावे येतात.


पशुधन विकास अधिकारी निम्मेच 
जिल्ह्यातील अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी, परिचर, पट्टीबंधकांची पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना पशुधनावर वेळेवर उपचार करण्यास मोठी कसरत करावी लागते. जिल्ह्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची एकूण १०२ पदे मंजूर आहेत. यापैकी ५९ पदे भरण्यात आली असून ४९ पदे रिक्त आहेत. पशुधनावर योग्य व वेळेत उपचार मिळावे, यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी पशुपालकांमधून होत आहे. 


दोन्ही दवाखान्यांचे अंतर १६ किमीचे 

  • कुन्हाडी व गुरखळा हे अंतर जवळपास १६ किलोमीटरचे आहे. कुन्हाडी येथे सेवा दिल्यानंतर पुन्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना १६ किलोमीटरवरील गुरवळा येथील दवाखान्यात जावे लागते. 
  • विशेष म्हणजे, गुरवळा पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत येणाऱ्या गावांचेही अंतर मोठे असल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पशुंवर उपचार करण्यास वेळेवर पोहोचता येत नाही. 
  • तर कुन्हाडी पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत येणारी गावे जवळजवळ असल्याने येथे उपचार करताना तेवढा त्रास होत नसल्याची माहिती आहे.


बदलीनंतर डॉक्टरांना केले भारमुक्त 
कुन्हाडी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चातगावच्या दवाखान्यात बदली झाली. त्यामुळे त्यांना भारमुक्त करण्यात आले. त्यामुळे येथे जागा रिक्त झाली.


"गुरवळाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिरणकर यांच्याकडे कुन्हाडी येथील दवाखान्याचा प्रभार सोपविण्यात आला आहे. याबाबतची माहिती आपण वरिष्ठांना दिली आहे. काही दिवसात स्वतंत्र डॉक्टर मिळेल." 
- डॉ. अजय ठवरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. गडचिरोली.

Web Title: As there are no veterinary posts vacant in the district, one doctor has to handle the burden of two to three clinics.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.