लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अपघातात अधू झालेल्या प्रियकराने वैतागून एक दिवस व्हॉटॲपवर आत्महत्येचे स्टेटस ठेवले आणि विष प्राशन केले, ही बातमी कळाल्यावर धक्का बसलेल्या प्रेयसीने गळफास लावला, तिला भावाने वाचविले. मात्र, नियतीच्या मनात औरच होते, विष प्राशन केलेला प्रियकर मृत्यूच्या दारातून परतला, पण त्याच्याखातर गळफास घेतलेल्या प्रेयसीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्यातील एका गावात ३ फेब्रुवारी रोजी हा हृदयद्रावक प्रसंग समोर आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, ३० वर्षीय तरुण आणि १९ वर्षीय तरुणीचे प्रेमसंबंध होते. तीन वर्षापूर्वी दुचाकी अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आणि तेव्हापासून तो अंथरुणाला खिळून होता. उपचारासाठी जमापूंजी संपल्याने वैफल्यातून त्याने २८ जानेवारी रोजी सोशल मीडियावर निरोपाचे स्टेटस ठेवले आणि प्रेयसीला फोन करून मी उद्या नसेल असे सांगून विष प्राशन केले. गडचिरोली ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
प्रियकर वाचला, पण...
तरुणाने विष घेतल्याचे समजताच मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्याचे प्राण वाचले. मात्र, ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. आपला प्रियकर आता जगात नाही किंवा तो वाचणार नाही, या भीतीने तरुणी प्रचंड व्याकूळ झाली. याच धक्क्यातून तिने राहत्या घरी गळफास लावून घेतला. भावाने दरवाजा तोडून तिला फासावरून खाली उतरविले.
आठवडाभराची झुंज अपयशी
तरुणीला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, सात दिवसांच्या उपचारानंतर ३ फेब्रुवारी रोजी तिची प्राणज्योत मालवली. ज्या प्रियकरासाठी तिने हे पाऊल उचलले, तो आता मृत्यूच्या धोक्याबाहेर आहे, पण हे पाहायला ती मात्र उरली नाही. या हृदयद्रावक घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Web Summary : In Gadchiroli, a man's suicide attempt after an accident led his girlfriend to take her own life. Though he survived, she tragically passed away after a week of treatment, highlighting a heartbreaking twist of fate. The incident has left the community in shock.
Web Summary : गढ़चिरौली में, दुर्घटना के बाद एक आदमी के आत्महत्या के प्रयास के कारण उसकी प्रेमिका ने आत्महत्या कर ली। हालाँकि वह बच गया, लेकिन इलाज के एक सप्ताह बाद उसकी दुखद मृत्यु हो गई, जो भाग्य के एक हृदयविदारक मोड़ को उजागर करती है। इस घटना से समुदाय सदमे में है।