वार्षिक खर्च १७० कोटी

By Admin | Updated: April 11, 2015 01:25 IST2015-04-11T01:25:43+5:302015-04-11T01:25:43+5:30

गोंडवाना विद्यापीठाने २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात १६९ कोटी ४४

The annual expenditure is 170 crores | वार्षिक खर्च १७० कोटी

वार्षिक खर्च १७० कोटी

गोंडवानाचा अर्थसंकल्प : आदिवासी विकास विभागाचे सहकार्य
गडचिरोली :
गोंडवाना विद्यापीठाने २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात १६९ कोटी ४४ लाख ९४ हजार रूपयांचा खर्च होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या अंदाजपत्रकात ११ कोटी ५८ लाख रूपयांची वाढ झाली आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी काम करणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वेतन व इतर प्रशासकीय खर्चाचा भार शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून मागविला जातो. मागील वर्षी विद्यापीठाने १३२ कोटी ९६ लाख रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. प्रत्यक्षात मात्र १५७ कोटी ८४ लाख रूपयांचा खर्च झाला. जवळपास तेवढाच निधी वेगवेगळ्या उत्पन्नाच्या माध्यमातून विद्यापीठाला प्राप्त झाला. यावर्षी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात वाढ झाली असून १६९.४४ लाख ९४ हजार रूपयांचा खर्च अपेक्षीत आहे. विद्यापीठाला १६९ कोटी २२ लाख १८ हजार रूपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे.
विद्यापीठाला मुदत ठेव, दान निधी, अग्रीमावरील व्याज व राखीव इमारत निधीवरील व्याजापोटी १ कोटी १८ लाख रूपये प्राप्त होणार आहेत. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानासाठी महाराष्ट्र शासन ९ कोटी १५ लाख रूपयांचा निधी देणार आहे. विद्यापीठाशी सलग्न असलेल्या महाविद्यालयांकडून संलग्नीकरण शुल्क, विद्यालय माहिती संगणकीकरण शुल्क, नवीन महाविद्यालयांकडून प्रास्ताव शुल्क, वार्षिक संलग्नीकरण शुल्क, नवीन महाविद्यालयांकडून प्रथम शुल्क आदींच्या माध्यमातून १ कोटी ४२ लाख, विद्यार्थ्यांकडून विविध प्रमाणपत्रासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातून १ कोटी ३५ लाख रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. परीक्षा शुल्काच्या माध्यमातून ९ कोटी ३७ लाख, मानवशास्त्र विभाग, स्वयंरोजगार योजना विभाग, निरंतर प्रौढ शिक्षण विभागाच्या माध्यमातून १९ कोटी, इतर विभागातून ९ कोटी ५० लाख, इमारतीच्या भाड्यातून ३ कोटी, वेतनोत्तर अनुदानाच्या माध्यमातून पाच कोटी व इतर गुंतवणुकीतून २५ कोटी एकूण आवर्ती व अनावर्ती उत्पन्नाच्या माध्यमातून ५५ कोटी १२ लाख रूपये प्राप्त होणार आहेत.
प्राप्त उत्पन्नातून शिक्षक व शिक्षेत्तर वेतनावर ९ कोटी १५ लाख, प्रशासकीय खर्चावर ४ कोटी ८६ लाख परीक्षेसाठी ७ कोटी २२ लाख, पद्व्युत्तर शिक्षण विभागासाठी १५ लाख ८० हजार रूपये खर्च केले जाणार आहेत. विद्यापीठातील जुन्या इमारतीची दुरूस्ती, परिसराचे सुशोभीकरण यावर तीन कोटी ५२ लाख, शारीरिक शिक्षण विभागावर ६४ लाख, विद्यार्थी कल्याण कार्यक्रमांतर्गत युवक मोहत्सव, विद्यार्थ्यांचे गणवेश, प्रवास खर्च उपसकर, उपकरण दुरूस्ती व खरेदी यावर ३१ लाख, विद्यापीठाच्या ग्रंथालयावर २५ लाख, संगणक खरेदी, दूरध्वनी खर्च यावर ३० लाख, निरंतर प्रौढ शिक्षण विभागावर पाच लाख रूपये खर्च होणार आहेत. (नगर प्रतिनिधी)

एसटीआरसी प्रकल्पासाठी १४ कोटी ७० लाखांचा निधी
गोंडवाना विद्यापीठात ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळख असलेल्या सायन्स अँड टेक्नालॉजी रिसोर्स सेंटरच्या विकासासाठी १४ कोटी ७० लाख ६८ हजार रूपयांचे अनुदान प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर प्रक्रिया करून तिचे मार्केटिंग व्हॅल्यू वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

उत्पन्नाचे मुख्य मार्ग
गोंडवाना विद्यापीठाला महाराष्ट्र शासनाकडून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनुदानासाठी ९ कोटी १५ लाख रूपये प्राप्त होणार आहेत. वेतनोत्तर अनुदानापोटी राज्य शासन पाच कोटींचा निधी देणार आहे.
आदिवासी विकास विभागाकडून मुले व मुलींच्या वसतिगृहांचे बांधकाम, परीक्षा भवन इमारत, ग्रंथालय इमारत, इतर उपकरणे, पुस्तके, जमीन खरेदी, सांस्कृतिक भवन, पद्व्युत्तर, शैक्षणिक विभागाच्या इमारतीसाठी जवळपास ८४ कोटी रूपयांचा निधी प्राप्त होणे अपेक्षीत आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून १० कोटी रूपये प्राप्त होणार आहेत.

वर्षभरात होणारे मुख्य खर्च
विद्यापीठाला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांच्या वेतनावर ९ कोटी १५ लाख, प्रशासकीय खर्चावर ४ कोटी ८६ लाख, परीक्षांचे आयोजन करण्यासाठी ७ कोटी २२ लाखांचा खर्च होणार आहे. इमारत दुरूस्तीवर ३ कोटी ५२ लाख रूपये खर्च होणार आहेत.
नवीन प्रशासकीय इमारत बांधकामावर पाच कोटी, वसतिगृहासाठी आठ कोटी, परीक्षा भवन २० कोटी, शैक्षणिक विभाग व ग्रंथालय इमारतीच्या बांधकामावर ३० कोटी, सांस्कृतिक भवन, पद्व्युत्तर शैक्षणिक विभागाच्या इमारतीसाठी १७ कोटी, ४० एकर जमीन खरेदीवर ६ कोटी रूपये खर्च होणार आहेत.

Web Title: The annual expenditure is 170 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.