जनावरांनाही होतो कॅन्सर; पशुपालकांनो, घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:32 IST2025-02-08T16:30:20+5:302025-02-08T16:32:21+5:30
चिकित्सा केली का? दुग्ध व्यवसायावरही होतो परिणाम : वेळीच करावा औषधोपचार

Animals also get cancer; Animal husbandry, be careful
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : माणसांसह जनावरांनाही कर्करोग होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. जसे माणसांच्या आहार-विहारात बदल झाला तसेच बदल जनावरांच्या आहारात झालेला आहे. त्यामुळे जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी पशुपालकांनी योग्य काळजी घ्यावी.
जिल्ह्यात शेतीक्षेत्र बरेच आहे. येथील लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. याशिवाय अनेक शेतकरी पशुपालन व दुग्ध व्यवसाय करतात. त्यांच्याकडे शेती कसणाऱ्या जनावरांसह दुधाळ जनावरेसुद्धा आहेत. या जनावरांची काळजी कशी घ्यावी, याबाबत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जात असले तरी अनेक पशुपालकांना जनावरांमधील कर्करोगाची ओळख होत नाही. जनावरांमधील हा कर्करोग पशुपालकांच्या लक्षात येत नसल्याने अनेकदा जनावरांचा अकाली मृत्यू होतो.
जनावरांतही प्रमाण वाढले
ज्याप्रमाणे माणसाला कर्करोग होतो. अगदी त्याचप्रकारे जनावरांना कर्करोग होतो. पाळीव कुत्री, गायी, बैल, म्हशी आदींमध्येही कर्करोगाचे प्रमाण आहे.
कर्करोगाचे दोन प्रकार
जनावरांमधील कर्करोगाचे दोन प्रकार आहेत. यामध्ये बेनाइल (हळूहळू वाढणारा) व मॅलेग्नंट (जलद गतीने वाढणारा) आदी दोन प्रकारांचा समावेश आहे. सदर प्रकार वेळीच लक्षात येत नाहीत. परंतु काही लक्षणे दिसताच पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
काय आहेत लक्षणे ?
जनावरांमध्ये गाठी किंवा सूज, वजन कमी करणे, कमी खाणे-पिणे, काम करण्याची शक्ती कमी होणे, थकवा येतो. जनावरांमध्ये शिंगाचा आकार कमी कमी होत जातो, त्यामुळे त्यांना त्याचा त्रास जाणवतो. याशिवाय श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो.
काय काळजी घ्याल?
पाळीव जनावरांच्या शिंगाना पेंट (वार्निस) लावला जातो. यामुळे सदर पेंट शिंगातून मांस पेशीत पोहोचतो. रंगामुळे पेशींना नुकसान होते. त्यामुळे पेंट लावू नये. जनावरांच्या पोटात प्लास्टिक जाणार नाही याची काळजी घ्यावी.
"प्लास्टिक पोटात गेल्याने फिनॉलिक कम्पाऊंड होऊन जनावरांच्या पेशीवर परिणाम होतो. याशिवाय विविध कारणांमुळे जनावरांना कर्करोग होत असल्याचेही दिसून आलेले आहे."
- डॉ. सचिन ढालकरी, पशुधन विस्तार अधिकारी, चामोर्शी