संतप्त गावकऱ्यांनी कमलापूर पीएचसीला ठोकले कुलूप
By Admin | Updated: October 29, 2016 01:46 IST2016-10-29T01:46:52+5:302016-10-29T01:46:52+5:30
अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभार याच ठिकाणी कार्यरत डॉ. डोंगरे यांच्याकडे देण्यात यावा,

संतप्त गावकऱ्यांनी कमलापूर पीएचसीला ठोकले कुलूप
आंदोलनाचा इशारा : डोंगरे यांच्याकडे प्रभार देण्याची मागणी
कमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभार याच ठिकाणी कार्यरत डॉ. डोंगरे यांच्याकडे देण्यात यावा, या मागणीसाठी कमलापूरवासीयांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला शुक्रवारी कुलूप ठोकले.
कमलापूर येथील एमबीबीएस डॉक्टर मामीडवार यांची प्रशासनाने चंद्रपूर जिल्ह्यात बदली केली. नवीन एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती होईपर्यंत त्यांना भारमुक्त करू नये, असे निवेदन जिल्हा आरोग्य विभागाला गावकऱ्यांनी दिले होते. तरीही प्रशासनाने १ आॅक्टोबर रोजी त्यांना भारमुक्त केले व कमलापूर पीएचसीचा प्रभार राजाराम येथील डॉ. मानकर यांच्याकडे देण्यात आला. मात्र डॉ.मानकर हे यापूर्वी कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात होते. त्यांची वागणूक येथील नागरिकांना आवडली नाही. त्यामुळे कमलापूर पीएचसीचा प्रभार डॉ. मानकर यांच्याकडे देऊ नये, तर कमलापूर येथेच गट ‘ब’ वैद्यकीय अधिकारी म्हणून मागील अनेक दिवसांपासून कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. डोंगरे यांच्याकडे देण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. परिणामी संतप्त गावकऱ्यांनी पीएचसीला कुलूप ठोकले. यावेळी सीताराम मडावी, महेश मडावी, संतोष ताटीकोंडावर, बोंदयालू गड्डम, कोडापे, साईनाथ पब्बावार आदी उपस्थित होते. डॉ. डोंगरे यांच्याकडे प्रभार न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कमलापूरवासीयांनी दिला आहे. (वार्ताहर)